घरगुती सिलेंडरवर किती लाखांचा विमा मिळतो; कधी मिळते रक्कम?

| Updated on: Dec 17, 2020 | 2:33 PM

घरगुती सिलेंडरमुळे कोणतीही दुर्घटना झाल्यास या विम्यातून संबंधितांना नुकसानभरपाई मिळते. | LPG Insurance

घरगुती सिलेंडरवर किती लाखांचा विमा मिळतो; कधी मिळते रक्कम?
indane lpg cylinder dac
Follow us on

नवी दिल्ली: आपल्या रोजच्या वापरात असलेल्या अनेक गोष्टींबाबत आपण बऱ्याचदा अनभिज्ञ असतो. एरवी आपण घरगुती सिलेंडरच्या (LPG) किंमतीबाबत प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असतो. मात्र, याच घरगुती सिलेंडरसोबत ग्राहकांना थोडाथोडका नव्हे तर 30 लाखांचा विमा (Insurance) मिळतो, ही गोष्ट आपल्याला माहितही नाही. घरगुती सिलेंडरमुळे कोणतीही दुर्घटना झाल्यास या विम्यातून संबंधितांना नुकसानभरपाई मिळते. (LPG cosumers accidental death insurance)

या विम्याचा फायदा कोणाला?

घरगुती सिलेंडरचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून ग्राहकांचा विमान उतरवला जातो. या कंपन्या एक नव्हे तर तीन प्रकारची विमा सुविधा ग्राहकांना देतात. LPG मुळे एखादी दुर्घटना घडल्यास मृत आणि जखमी व्यक्तींना या विम्याचे पैसे मिळतात. वित्तहानीसाठीही हा विमा लागू पडतो.

कसा मिळवाल हा विमा?

हा विमा उतरवण्यासाठी काही अटीशर्ती असतात. एखाद्या दुर्घटनेसाठी LPG कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या विम्याचे पैसे मिळवण्यासाठी दावा करता येतो. त्यानंतर संबंधित कंपनीकडून दुर्घटनेच्या ठिकाणाची आणि नुकसानीची पाहणी केली जाते. त्यानंतर विम्यातंर्गत नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली जाते.

किती रूपयांची नुकसान भरपाई मिळते?

कंपनीकडून देण्यात येणाऱ्या तीन प्रकारच्या विम्यांची रक्कम वेगवेगळी असते. दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यास सहा लाख रूपये मिळतात. तर दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना उपचारांसाठी प्रत्येकी दोन लाख रुपये मिळू शकतात. तर वित्तहानीसाठी दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची तरतूद विम्याच्या नियमांमध्ये आहे.

हा विमा मोफत मिळतो?

या विमा सुविधेसाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. विम्याचे हप्ते भरण्यासाठी पैसे ग्राहकांकडून मागितले जात नाहीत. दुर्घटना घडल्यानंतर विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाईची रक्कम पेट्रोलियम कंपन्यांना दिली जाते. त्यानंतर ही रक्कम पीडितांना दिली जाते.

संबंधित बातम्या:

आता अ‍ॅमेझॉनवरुन बुक करता येणार गॅस सिलेंडर

लक्षात ठेवा! 1 नोव्हेंबरपासून सिलेंडरच्या डिलिव्हरीचा नियमात झालेले बदल

पेन्शनधारकांनो लक्ष द्या; ‘हे’ प्रमाणपत्रं जमा न केल्यास पेन्शन थांबणार!

(LPG cosumers accidental death insurance)