आजपासून महाकुंभ 2025 चा शुभारंभ, साधू-संत आणि भाविक पहिल्या शाही स्नानासाठी दाखल; मोदींकडून शुभेच्छा

| Updated on: Jan 13, 2025 | 10:29 AM

सोमवारी १३ जानेवारी ते बुधवार २६ फेब्रुवारी असे तब्बल ४५ दिवस महाकुंभ मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या महाकुंभ मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

आजपासून महाकुंभ 2025 चा शुभारंभ, साधू-संत आणि भाविक पहिल्या शाही स्नानासाठी दाखल; मोदींकडून शुभेच्छा
Maha Kumbh Mela 2025
Follow us on

Maha Kumbh Mela 2025 : जगातील सर्वात मोठा धार्मिक महोत्सव अशी ओळख असणाऱ्या कुंभमेळ्याची आज सोमवार (१३ जानेवारी) पासून सुरुवात होणार आहे. उत्तरप्रदेशातील प्रयागराज या ठिकाणी असलेल्या गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावर आज पौष पौर्णिमेनिमित्त पहिले शाही स्नान संपन्न होणार आहे . सोमवारी १३ जानेवारी ते बुधवार २६ फेब्रुवारी असे तब्बल ४५ दिवस महाकुंभ मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या महाकुंभ मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. प्रयागराजमध्ये आजपासून महाकुंभचा दिमाखदार शुभारंभ करण्यात आला आहे. या महाकुंभसाठी आधीपासूनच साधू-संत आणि भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत.

या महाकुंभ मेळाव्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरद्वारे ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. “भारतीय मूल्ये आणि संस्कृती जपणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी हा एक अतिशय खास दिवस आहे. प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू होत आहे. हा महाकुंभ असंख्य लोकांना श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीच्या पवित्र संगमात एकत्र आणतो. हा महाकुंभ भारताच्या आध्यात्मिक वारशाचं प्रतीक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

तगडी सुरक्षा व्यवस्था

उत्तरप्रदेशातील प्रयागराजमध्ये होणाऱ्या या महाकुंभ मेळाव्यासाठी 45 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या मेळाव्यासाठी साधू-संत, भाविक तसेच परदेशातील व्यक्ती सहभागी होणार असल्याने यंदा सुरक्षेसाठी 55 हून अधिक फोर्स असणार आहेत. तसेच तब्बल 45,000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

महाकुंभच्या संपूर्ण व्यवस्थापनासाठी २,७५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने ४० कोटी भाविकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सक्षम केले आहे. त्यासोबतच AI-आधारित तब्बल २६८ व्हिडीओ कॅमेरे गर्दीच्या हालचालींच्या निरीक्षणासाठी तैनात करण्यात आले आहेत. वाहतूक व्यवस्थापनासाठी आणि पार्किंगची सोय करण्यासाठी २४० AI-आधारित प्रणाली तैनात करण्यात आली आहे.

किती शाही स्नान होणार? तारीख काय? 

प्रयागराज महाकुंभ मेळाव्यादरम्यान एकूण सहा शाही स्नान होणार आहेत. या कुंभमेळाव्यातील पहिला शाही स्नान 13 जानेवारी म्हणजे आज पार पडणार आहे. तर दुसरं शाही स्नान 14 जानेवारी 2025 रोजी मकरसंक्रातीच्या दिवशी असेल. यानंतर तिसरं स्नान 29 जानेवारी 2025 रोजी मौनी अमावस्येदिवशी होईल. तर चौथं स्नान 2 फेब्रुवारी 2025 रोजी वसंत पंचमी दिवशी होईल. यानंतरचे पाचवे शाही स्नान 12 फेब्रुवारी 2025 रोजी माघ पौर्णिमा दिवशी आणि शेवटचं शाही स्नान 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री दिवशी असेल.