नवी दिल्ली | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची (Maharashtra political crisis) सुनावणी अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे. आज सुप्रीम कोर्टात (Supreme court) तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवरून घमासान चर्चा झाली. खुद्द सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी राज्यपालांनी त्या वेळी घेतलेल्या निर्णयांवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. राज्यपालांचे वकील तुषार मेहता यांनी मांडलेल्या महत्त्वाच्या ४ मुद्द्यांपैकी तीन मुद्यांवर सुप्रीम कोर्टाने आक्षेप नोंदवले. सरकार अल्पमतात आल्याचं पाहून राज्यपालांनीच बहुमत चाचणीचा निर्णय घेणं, यावर आपण व्यक्तिशः नाराज असल्याची महत्त्वाची टिप्पणी सरन्यायाधीशांनी केली. सुप्रीम कोर्टाच्या प्रश्नांना तुषार मेहता यांनीदेखील उत्तरं दिली.
त्यानंतर दुपारच्या सत्रात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा पुन्हा युक्तिवाद सुरु झाला. राज्यपालांनी बहुमत चाचणीचा निर्णय न घेता वेगळं नेतृत्व स्वीकारणाऱ्या ३८ आमदारांना त्या वेळीच आयोगाकडे पाठवायला हवं होतं, असा युक्तिवाद सिब्बल यांनी मांडला. आजची कोर्टातील सुनावणी संपली असून उद्यादेखील कपिल सिब्बल या खटल्यातील अखेरचा युक्तिवाद सादर करतील. त्यानंतर खटल्याच्या निकालाची सर्वांना प्रतीक्षा असेल.
आजच्या दुपारच्या सत्रात कपिल सिब्बल यांनी महत्त्वाचा युक्तिवाद केला. लोकप्रतिनिधी जनतेतून निवडून येतात. निवडणूक आयोग त्यांना तसं पत्र देतं. त्यानंतर सभागृहात आमदारांची ओळख राजकीय पक्षांचा प्रतिनिधी अशीच ओळख असते. अध्यक्ष आणि राज्यपाल फक्त पक्षाला गृहित धरतात. आमदाराची कुठलीही इतर ओळख नसते.
लोकशाही म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ नाही. राज्यपाल, विधिमंडळ अध्यक्षांनी केवळ आमदारांच्या आकड्यांना नाही तर राजकीय पक्षालाही महत्त्व दिलं पाहिजे. त्यामुळे राज्यपालांनी आमदारांच्या आकड्याला नव्हे तर पक्षाला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. अन्यथा आयाराम गयारामचे युग अवतरेल, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
दरम्यान, सुप्रीम कोर्टात आज केंद्रीय निवडणूक आयागोकडून उत्तर सादर करण्यात आलंय. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचं नाव आणि पक्ष चिन्ह देण्याचा निर्णय कायद्यानुसार योग्य असल्याचं आयोगाच्या उत्तरात नमूद करण्यात आलंय. उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्षेप घेतला होता. मात्र हा आक्षेप चुकीचा असून आम्ही संविधानाला अनुसरूनच हा निर्णय घेतल्याचं आयोगाने उत्तरात म्हटलंय.
सुप्रीम कोर्टात उद्या महत्त्वाचा युक्तिवाद होणार आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल हे युक्तिवादातील अंतिम मुद्दे घटनापीठाकडे सादर करतील. त्यानंतर सत्तासंघर्षातील खटल्यातील युक्तिवाद संपण्याची शक्यता आहे. त्यानंतर घटनापीठातील सदस्य आपापसात चर्चा करून सत्तासंघर्षाचा निकाल देतील. उद्यानंतर हा निकाल राखून ठेवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.