नवी दिल्ल : एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांचे बंड, आमदारांवर केलेली अपात्रतेची कारवाई, शिंदे सरकारचा शपथविधी, बहुमत चाचणी या सगळ्यांवर सुप्रीम कोर्टात सुरु असलेली सुनावणी ही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होणार नाही, असे दिसते आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 4 सप्टेंबरपर्यंतच्या यादीत हा खटला समाविष्ट करण्यात आलेला नाही. यामुळे नविन सर न्यायाधीश उदय लळीत( new Chief Justice Uday Lalit) हेच महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा फैसला करणार हे स्पष्ट झाले आहे.
एकनाथ शिंदे गटाला कमकुवत करण्यासाठी शिवसेनेकडून 16 आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आलीय. त्याबाबत 16 पिटिशनही सादर करण्यात आलेत. 16 आमदारांच्या निलंबन नोटिसीविरोधात एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
4 सप्टेंबर पर्यंत सुनावणीसाठी येणाऱ्या प्रकरणांची यादी सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या खटल्याच्या याचिकेचा समावेश करण्यात आलेला नाही. एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाची कोणतीही याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या यादीत नाही. सर्वोच्च न्यायालयाकडून 4 सप्टेंबरपर्यंतची 32 पानांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होणाऱ्या सुनावणीमध्येही महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षबाबतची याचिका समाविष्ट नाही, असे समोर आले आहे.
सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा 26 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत. 17 फेब्रुवारी 2014 रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झाली होती. त्यांनी देशाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ गेल्यावर्षी म्हणजेच 24 एप्रिल 2021 रोजी घेतली होती.
सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सुरु होती. सरन्यायाधीश रमणा हे 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत. यानंतर उदय लळीत यांची सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती होणार आहे. यामुळे आता लळीत हेच एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाच्या याचिकेवर निर्णय देणार आहेत.
उदय लळीत यांच्या रुपाने देशाला मराठी सरन्यायाधीश मिळणार आहेत. ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्याचे सुपुत्र आहेत. गिर्ये कोठारवाडी गावात त्यांचं मूळ घर आहे. उदय लळीत यांचे आजोबा आणि वडील दोघेही वकील होते. उदय लळीत यांचे आजोबा वकिलीसाठी सोलापूरला गेले आणि त्यानंतर लळीत कुटुंब तिथेच स्थायिक झालं.
उदय लळीत यांचं शिक्षण मुंबई विद्यापीठातून झालं. 1983 मध्ये त्यांनी वकिली क्षेत्राला सुरुवात केली. 1985 च्या अखेरीपर्यंत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली. जानेवारी 1986 मध्ये त्यांनी दिल्ली हायकोर्टात प्रॅक्टिसला सुरुवात केली. एप्रिल 2004 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केलं. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया लीगल सर्व्हिसेस कमिटीचे ते सदस्य देखील होते. सध्याचे सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा यांनी उदय लळीत यांच्या नावाची शिफारस केलीय. येत्या 27 ऑगस्टला उदय लळीत सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत.