नवी दिल्लीतील पाकिस्तानी दुतावासात नापाक कृत्य घडले. या दुतावासात काम करणाऱ्या भारतीय महिलेशी छेडछाड करण्यात आल्याचे समोर आले आहे. यापूर्वी दुतावासाचा अधिकारी साद अहमद वाराईच याच्याकडे महिलेने फिर्याद केली होती. पण त्याने कर्मचाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुन्हा हा प्रकार घडल्यानंतर पीडितेने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर मिन्हाज हुसैन या 54 वर्षीय नागरिकाला देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
स्वयंपाकी देत होता त्रास
मिन्हाज हुसैन हा पाकिस्तानी उच्चायुक्त पदाचे प्रभारी साद अहमद वाराईच यांचा स्वयंपाकी आहे. या ठिकाणी एक भारतीय महिला काम करते. ती साद अहमद यांच्या घरी स्वच्छता आणि स्वयंपाक घरात मदतनीस म्हणून काम पाहते. ती टिळक रस्त्यावरील वाराईच यांच्या अधिकृत निवासस्थानी असलेल्या सर्व्हंट क्वार्टरमध्ये राहत होती.
पाच महिन्यांपासून त्रास
मिन्हाज हा फेब्रुवारीत पाकिस्तानमधून या ठिकाणी नोकरीसाठी आला. तेव्हापासून तो पीडितेची छेडछाड काढत होता. तिच्यावर लैंगिक संबंधासाठी दबाव टाकत होता. अश्लील शेरेबाजीला कंटाळून या महिलेने साद अहमद यांच्याकडे त्याची तक्रार केली होती. पण त्यांनी त्याला पाठीशी घातले. मिन्हाज बकरी ईदच्या निमित्ताने पाकिस्तानला गेला. 30 जूनपर्यंत ही नोकरी आणि घर सोडण्याचे आदेश या विधवा महिलेला देण्यात आले. तर मिन्हाज याला पुन्हा भारतात बोलविण्यात आले.
28 जून रोजी तक्रार
या अमानुष व्यवहारानंतर महिलेने 28 जून रोजी टिळकमार्ग पोलीस ठाण्यात मिन्हाज हुसैन याच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्याआधारे आरोपी मिन्हाज अहमद हुसैन याच्याविरोधात IPC कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अडचणी वाढल्यानंतर मिन्हाजला पाकिस्तानी दुतावासाने मायदेशी रवाना केले. त्याच्यावर कोणतीही कार्यवाही दुतावासाने केली नाही. यापूर्वी तक्रार दिली असता कर्मचाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न दुतावासाने केला. यापूर्वी पण पाकिस्तानला जाणाऱ्या एका प्राध्यापक महिलेकडे दुतावासातील कर्मचाऱ्यांनी शारिरीक सुखाची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. आता या घटनेने पाकिस्तानी दुतावासातील अधिकाऱ्यांची प्रवृत्ती समोर आली. अधिकाऱ्यांची आणि दुतावासाची नाचक्की झाली.