ममतादीदींचे हिंदुत्वाचे राजकारण, भाजपचे वाढले टेन्शन, 143 कोटी रुपये खर्चून बांधले प्रसिद्ध मंदिर

| Updated on: Jun 20, 2024 | 8:20 PM

गेल्या अनेक वर्षांपासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मुस्लिम तुष्टीकरणाच्या आरोपांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, ममता बॅनर्जी पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या रथावर आरूढ होणार आहेत. यामुळे भाजपचे टेन्शन वाढले आहे.

ममतादीदींचे हिंदुत्वाचे राजकारण, भाजपचे वाढले टेन्शन, 143 कोटी रुपये खर्चून बांधले प्रसिद्ध मंदिर
MAMTA BANARJI
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भाजपकडून वारंवार होणाऱ्या मुस्लिम तुष्टीकरणाच्या आरोपांना सामोरे जावे लागत होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपने हाच प्रचार केला होता. मात्र, ममतादीदी यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव करून मुस्लिम तुष्टीकरणाचे आपल्यावरील आरोप खोडून काढले. त्यामुळे त्यांचे मनोबल उंचावलेले दिसत आहे. आता भाजपच्या खेळीला उत्तर देण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी हिंदुत्वाचे राजकारण करण्यास सुरवात केली आहे. मात्र, ममता दीदींच्या या खेळीमुळे भाजपला मात्र आपली हिंदू व्होट बँक गमावण्याची भीती वाटू लागली आहे.

पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील दिघा या किनारपट्टीवरील जगन्नाथ धाम हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. 2019 मध्ये त्यांनी या मंदिराची पायाभरणी केली. पुरीच्या जगन्नाथ मंदिरात जशी गर्दी जमते तशीच गर्दी इथेही जमणार असल्याचा दावा त्यांनी त्यावेळी केला होता. समुद्र किनारा असल्याने पर्यटकांना पुरीप्रमाणेच येथेही सर्व सुविधांचा आनंद घेता येईल, असे त्या म्हणाल्या होत्या.

पश्चिम बंगाल हाउसिंग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (WBHIDCO) ने 143 कोटी रुपये खर्चून हे मंदिर बांधले आहे. नवीन दिघा रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर सुमारे 22 एकरात मंदिराचा परिसर पसरलेला आहे. मंदिराचे डिझायनिंग आणि इंटीरियरचे काम कोलकाता येथील डिझाईन स्टुडिओने केले आहे. ओडिशातील पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराची प्रतिकृती म्हणून हे मंदिर जगन्नाथ धाम म्हणून विकसित केले गेले आहे.

राज्य सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जगन्नाथ मंदिर पूर्णतः बांधून तयार आहे. पण लोकसभा निवडणुकीमुळे उद्घाटनाची तारीख निश्चित करण्यात आली नव्हती. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा आहे. 12 व्या शतकात चैतन्य महाप्रभूंनी पुरीच्या जगन्नाथ मंदिराला भेट दिली तेव्हापासून बंगाली हिंदू कुटुंबांची भगवान जगन्नाथावर गाढ श्रद्धा आहे. पश्चिम बंगालमध्ये दरवर्षी रथयात्रा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. याच रथयात्रा उत्सवादरम्यान मुख्यमंत्री बॅनर्जी या मंदिराचे उद्घाटन करतील अशी माहिती देण्यात आली आहे. 7 जुलैपासून रथयात्रा उत्सव सुरु होत आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नव्याने बांधलेल्या जगन्नाथ धाम मंदिराचे उद्घाटन करू शकतात अशी शक्यता आहे.

ममता बॅनर्जी यांची हिंदुत्वाच्या रथावर स्वार होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी हिंदू धर्माच्या अनुयायांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक योजना राबवल्या होत्या. 2020 मध्ये त्यांनी 1000 रुपयांची मासिक भत्ता योजना आणि 8000 गरीब ब्राह्मण पुरोहितांसाठी मोफत घर योजना सुरू केली होती. याशिवाय गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी दुर्गापूजेवेळी दुर्गापूजा समित्यांना आर्थिक मदत आणि वीज शुल्कात सबसिडी दिली होती.