इंफाळ : मणिपूर मागच्या काही दिवसांपासून धगधगतं आहे. मणिपूरमधील हिंसाचारात आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू झाला आहे. तर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी हा हिंसाचार थांबवण्याचं आवाहन केलं आहे. तसंच काँग्रेस नेते शशी थरूर यांनी राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.
मणिपूरमध्ये 3 मेला आदिवासी आंदोलनात हिंसाचार उसळला. या हिंसाचारात 52 जणांचा मृत्यू झाला आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी वाढता हिंसाचार पाहता काल सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. यासोबतच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरक्षा दलांच्या प्रमुखांशीही चर्चा केली. हिंसाचार लवकरात लवकर थांबावा आणि राज्यात शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत.
काँग्रेस नेते शशी थरूर यांनी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप शशी थरूर यांनी केला आहे. वाढता हिंसाचार पाहता राज्य सरकार हे सगळं रोखण्यात अपयशी ठरत आहे, असं दिसतंय. हा हिंसाचार थांबणं गरजेचं आहे, त्यामुळे मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी थरूर यांनी केली आहे.
आयर्नलेडी अशी ओळख असलेल्या नागरी हक्क कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली आहे. मणिपूरचा दौरा करून लवकरात लवकर या हिंसाचाराला थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी इरोम शर्मिला यांनी केली आहे.
मणिपूरमधील हिंसाचार थांबवण्यासाठी महिलांना पुढे येण्याची विनंती इरोम शर्मिला यांनी केली आहे. मणिपूर धगधगत आहे. लोकांच्या वेदना पाहून मला अतिव दुःख होतंय. मी सर्व महिलांना, आदिवासींना एकत्र येऊन हिंसाचार संपवण्याचे आवाहन करते, असं इरोम शर्मिला म्हणाल्या आहेत.
हिंसाचारग्रस्त राज्यात अधिक सुरक्षा दल पाठवून फायदा होणार नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भारताच्या सरन्यायाधीशांनी मणिपूर दौरा करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी लवकरात लवकरत भेट देत प्रशासनाला आदेश द्यावेत, असं आवाहनही इरोम शर्मिला यांनी केलं आहे.