Manipur Violence : व्हायरल व्हीडिओ प्रकरणी मणिपूर पोलिसांना सापडले सबळ पुरावे; ‘तो’ फोन उलगडा करणार?

| Updated on: Jul 24, 2023 | 9:27 AM

Manipur Violence viral video 2023 : मणिपूरमधील नग्न अवस्थेतील महिलांची धिंड काढल्याप्रकरणी मोठी अपडेट; अखेर 'तो' फोन पोलिसांच्या हाती

Manipur Violence : व्हायरल व्हीडिओ प्रकरणी मणिपूर पोलिसांना सापडले सबळ पुरावे; तो फोन उलगडा करणार?
Follow us on

Manipur Violence Viral Video 2023 : मणिपूर… ईशान्य भारतातील एक महत्वाचं राज्य… पण मागची अडीच महिने इथं फक्त दंगलीचा ‘धूर’ दिसतोय. मागची अडीच महिने मणिपूर धुमसतंय. दंगली-मारामाऱ्या ही प्रकरणं तिथं रोजची झाली आहेत. अशात त्यावर कोणताीही ठोस भूमिका, उपाययोजना केल्याचं दिसत नाहीये. पण या सगळ्या घडामोडींवर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यावर भाष्य केलं. एका व्हीडिओवर कारवाई का केली नाही, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारला अन् देश खडबडून जागा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच या घटनांवर भाष्य केलं. आता या व्हायरल व्हीडिओ प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.

व्हायरल व्हीडिओ प्रकरणाचा तपास करत असताना मणिपूर पोलिसांना एक महत्वाचा पुरावा हाती लागला आहे. एक फोन पोलिसांना सापडला आहे. पोलिसांना असा अंदाज आहे की, या मोबाईलचा वापर नग्न महिलांची धिंड काढली तेव्हा करण्यात आला. या मोबाईलच्या माध्यमातून महिलांचा व्हीडिओ काढण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.

मोबाईल रहस्य उलगडणार?

व्हायरल व्हीडिओ प्रकरणी एक मोबाईल पोलिसांना सापडला आहे. हा मोबाईल या सगळ्या प्रकणातील महत्वाचा दुवा बनू शकतो, असा पोलिसांना अंदाज आहे. व्हायरल व्हीडिओ आणि त्यामागचे राज हा मोबाईल उघड करण्याची शक्यता आहे.

पोलिसांना मिळालेला हा फोन सायबर सेलकडे पाठण्यात आला आहे. याच मोबाईलमधून त्या घटनेचा व्हीडिओ शूट करण्यात आल्याची माहिती आहे.

नग्न अवस्थेत महिलांची धिंड काढणाऱ्या सहा आरोपींना मणिपूर पोलिसांनी अटक केली आहे. यात एक अल्पवयीन आरोपी आहे. या आरोपींची सध्या पोलीस कसून चौकशी करत आहेत.

व्हायरल व्हीडिओ काय?

चार मे रोजी मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात एक घटना घडली. यात दोन महिलांना निर्वस्त्र करत धिंड काढण्यात आली. या घटनेला आता दोन महिन्यांहून अधिक दिवस झाले आहेत.

न्यायालयाकडून भाष्य

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मणिपूरच्या घटनेवर भाष्य केलं. या घटना खपवून घेता येणार नाही. व्हायरल झालेला मणिपूरमधील व्हीडीओ चिंताजनक आहे. या प्रकरणातील आरोपींवर मे महिन्यातच कारवाई होणं अपेक्षित होतं.मानवी हक्क आणि महिलांच्या अधिकारांचं हे सर्रासपणे या घटनेत उल्लंघन झालं आहे. केंद्र आणि राज्य सरकारने या प्रकरणी तात्काळ कारवाई करावी, असा न्यायालय आदेश देत आहे, असं चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.

संतापाची लाट

सर्वोच्च न्यायालयाने या घटनेवर भाष्य केलं. त्यानंतर देशभर या घटनेवर प्रतिक्रिया उमटू लागल्या. सर्वच स्तरातून संतापाची लाट उसळली.