मुंबई : मणिपूरमधील दोन महिलांचा व्हिडीओ देशभर व्हायरल झाला आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे मणिपूरमधील भीषण वास्तव लोकांच्या समोर आलं खरं पण ही घटना आताची नसून मे महिन्यात घडली होती. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे नराधमांनी दोन नाहीतर तीन महिलांना विवस्त्र केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत त्यामधील एक पीडितेने 4 मेला नेमकं काय घडलं होतं? याबाबत मोठा खुलासा केला आहे.
मैतेई समाजाच्या लोकांनी फाइनोम गावावर तसा 3 मेलाच हल्ला केला होता. कारण त्या गावामध्ये कुकी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. 3 मे रात्री 3 वाजता फाइनोम गावात घुसून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. मात्र कुकी समाजाच्या लोकांनी त्यांना हुसकावून माघारी परतवून लावलं होतं.
4 मेला रात्री मैतेई समाजातील जळपास 800 ते 1000 तरूण परत एकदा फाइनोम गावात घुसले. त्यांच्यातील प्रत्येकाच्या हातामध्ये लाकूड आणि हत्यारं होतीत. मैतेई समाजाने गावकऱ्यांवर हल्ला सुरू केला. त्यांची घरं जाळलीत सर्व लोक आपला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले. यामधील 5 जणांनी जंगलाच्या दिशेने पळायला सुरूवात केली, यात 3 महिला आणि 2 पुरूषांचा समावेश होता.
पाच कुकी समाजाच्या लोकांना नोंगपोक सेकमाई पोलीस स्टेशनच्या टीमने त्यांना गाडीमध्ये घेतलं. मात्र पुढे गेल्यावर त्यांना मैतेई समाजाच्या लोकांनी अडवलं आणि गाडीमधून पाचही जणांना बाहेर काढलं. पोलीस त्यांना वाचवतील असं वाटलं पण तसं काही झालं नाही. त्यातील 53 वर्षीय पीडितने सांगितल की, रात्रीपासूनच आम्ही घाबरलो होतो आणि परत सकाळी झालेल्या या हल्ल्यामुळे आम्ही जंगलाच्या दिशेने पळत गेलो होतो.
23 वर्षीय पीडितने सांगितलं की, आम्ही पोलिसांच्या गाडीमध्ये होतो त्यामुळे सुरक्षित होतो असं वाटलं होतं. मात्र पोलिसांनी मैतेई समाजाच्या लोकांमध्ये आम्हाला सोडलं, आम्हाला बाहेर सोडल्यावर घोळक्यामध्ये असलेल्या लोकांनी आम्हाला जर जिवंत राहायचं असेल तर अंगावरील कपडे काढ अशी धमकी दिली. पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही अखेर आम्ही कपडे काढल्याचं तिने सांगितलं.
जे दोन पुरूष होते त्यातील एक 56 वर्षाच्या व्यक्तिला मारलं आणि त्यानंतर दुसरा 19 वर्षीय तरूण मुलगा ज्याने प्रतिकार केला तर त्यालाही संपवण्यात आलं. दोघांना मारल्यावर जमावाने तिघींना कपडे काढायला भाग पाडलं आणि त्यांचा व्हिडीओ शुट करण्यात आला. मात्र यामधील फक्त दोघी व्हिडीओमध्ये दिसल्या होत्या. पण प्रत्यक्षात तिघींना विवस्त्र करण्यासाठी भाग पाडलं गेलं होतं.
दरम्यान, 19 जुलैला त्या दोन महिलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सगळीकडे खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी आम्ही आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती दिली.