जयपूर-अजमेर महामार्गावर एका सीएनजी टँकरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे 6 जणांचा मृत्यू झाला. तर 30 जण चांगलेच होरपळले. शुक्रवारी सकाळी 5:30 वाजता एक सीएनजीने भरलेला टँकर दुसर्या ट्रकावर आदळला. त्यानंतर या टँकरला भीषण आग लागली. या भीषण स्फोटाने एकाचवेळी 40 हून अधिक वाहनांना आग लागली. या घटनेत 6 जण जागीच ठार झाले. पोलीस मृतदेहाचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी, 20 डिसेंबर रोजी सकाळी भांकरोटा परिसरात जयपूर-अजमेर महामार्गावर हा स्फोट झाला. रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाजवळ सीएनजी टँकर आणि ट्रकमध्ये अपघात झाला. त्यामुळे टँकरला आग लागली. या आगीने जवळील पाईप कारखाना, आजूबाजूची वाहनं, रस्त्यावरील 40 वाहनं, पेट्रोल पंप यांना विळख्यात घेतले. या भीषण अग्निकांडाने पाहता पाहता रौद्ररूप घेतले. पोलीस आणि अग्निशमन दल मृतदेहाचा शोध घेत आहेत.
मानसिंह रूग्णालयात जखमींवर उपचार
या महामार्गावरून एक ट्रॅव्हल्स सुद्धा जात होती. त्यात प्रवासी होते. तिला सुद्धा आग लागली. त्यावेळी अनेकांनी या बसमधून उड्या घेत जीव वाचवला. तर काही प्रवासी या आगीत होरपळले. तात्काळ स्थानिक लोकांनी, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अनेकांना मदत केली. या आगीतून बाहेर काढले. हा सीएनजी टँकर स्फोट इतका भयानक होता की, जणू बॉम्ब स्फोट झाला.
घटनास्थळावर अग्निशमन दल पोहचले
अग्निशमन दलाच्या 20 वाहनांनी या ठिकाणी तातडीने धव घेतली. आग विझवण्याचा प्रयत्न केला. तरीही या आगीवर लवकर नियंत्रण मिळवता आले नाही. प्रशासनाने काही तास या महामार्गावरील वाहतूक बंद केली होती. या भागात धूराचे काहूर माजले. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे जखमींना भेटण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी या सर्व प्रकाराची माहिती घेतली. त्यांनी जखमींची विचारपूस केली. काही वाहनांमध्ये माणसं अडकल्याची भीती असल्याने अग्निशमन दल आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहे. तर काही वाहनात मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.