औषधांच्या पावतीवर लिहिलं श्री हरि आणि औषधांची नावं हिंदीत, डॉक्टर आहे तरी कोण?

| Updated on: Oct 17, 2022 | 6:23 PM

मध्य प्रदेशातल्या एका डॉक्टरची चिठ्ठी सध्या जोरदार चर्चेत आहे. या डॉक्टरांनी चक्क हिंदीत गोळ्यांची नावं लिहिली आहेत...

औषधांच्या पावतीवर लिहिलं श्री हरि आणि औषधांची नावं हिंदीत, डॉक्टर आहे तरी कोण?
Image Credit source: social media
Follow us on

भोपाळः एमबीबीएसचं शिक्षण हिंदी (MBBS in Hindi) भाषेतून सुरु करणारं मध्य प्रदेश हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वीच यासंबंधीच्या पुस्तकांचं प्रकाशन झालं. त्यानंतर आता मध्ये प्रदेशातीलच एका डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन (Hindi Prescription) सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. या डॉक्टरांनी चिठ्ठीतील नावं हिंदी भाषेतून लिहिलीत.

विशेष म्हणजे RX ऐवजी चिठ्ठीत या डॉक्टरने श्री हरि ओम असं लिहिलंय. मध्य प्रदेशातल्या सतना जिल्ह्यातील मेडिकल ऑफिसरने लिहिलेली ही चिठ्ठी आहे.

एका रिपोर्टनुसार, कोटर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील मेडिकल ऑफिसर डॉ. सर्वेश सिंह यांनी लिहिलेलं हे प्रीस्प्रिप्शन आहे.

दोन दिवसांपूर्वी हिंदी भाषेतून एमबीबीएसचं शिक्षण सुरू करताना घेण्यात आलेल्या जाहीर कार्यक्रमात यासंबंधी उल्लेख झाला होता. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भाषणात म्हटलं, औषधांच्या चिठ्ठीत आता हिंदीतून नावं आली तरी आश्चर्य वाटायला नको…

डॉ. सर्वेश यांना विचारलं असता, त्यांनी सांगितलं, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा कार्यक्रम पाहिला. मुख्यमंत्र्यांचं भाषणही ऐकलं. त्यात ते म्हणाले की, सरकारी रुग्णालयांत औषधांचं प्रिस्क्रिप्शन हिंदीतून लिहिण्याचा प्रयत्न करावा…

यावर मी विचार केला आणि त्याची सुरुवात आजपासूनच का केली जाऊ नये, असं वाटलं, अशी प्रतिक्रिया डॉ. सर्वेश यांनी दिली.

मेडिकल ऑफिसर डॉ. सर्वेश यांनी सांगितलं की, रश्मी सिंह नावाची एक महिला आज पहिल्यांदाच पीएचसीमध्ये उपचारासाठी आली. पोटदुखीची तिला समस्या होती. तिला देण्यात आलेल्या चिठ्ठीवर हिंदीतून नावं लिहिली.

मेडिकल ऑफिसरने तिची पूर्ण केस हिस्ट्रीदेखील हिंदीतून लिहिली. तसेच RX च्या ऐवजी श्री हरि लिहिलं… त्यानंतर औषधांची नावं हिंदीतून लिहिली.

सोशल मीडियावर डॉक्टरांनी हिंदीतून लिहिलेल्या या चिठ्ठीची सध्या जोरदार चर्चा आहे.

डॉ. सर्वेश यांनी इंदौर येथील देवी अहिल्य विद्यापीठातून 2017 मध्ये एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलंय. नोव्हेंबर 2019 मध्ये डॉ. सर्वेश यांची कोटर येथील आरोग्य केंद्रात नियुक्ती झाली. तेव्हापासून ते येथे सेवेत आहेत.