नवी दिल्ली | 11 डिसेंबर 2023 : गेल्या काही काळात हार्ट ॲटॅक येऊन अनेक तरूणांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या कानावर येत आहेत. यामध्ये किशोरवयीन मुलांपासून ते ४०-५० वयोगटातील व्यक्तींचाही समावेश आहे. कमी वयातच येणाऱ्या हार्ट ॲटॅकमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. असाच एक धक्कादायक प्रकार मेट्रोमध्येही घडला आहे. तेथे एका एमबीबीएसच्या विद्यार्थ्याला प्रवासादरम्यानच हार्ट ॲटॅक आला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अवघ्या 25 वर्षांच्या या तरूण विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे एकच हळहळ व्यक्त होत आहे. ही धक्कादायक घटना दिल्लीत घडली असून मेट्रोप्रवासादरम्यानच तो विद्यार्थी खाली कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं खरं पण तोपर्यंत उशीर झाला होता. तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. मयंक गर्ग असे मृत तरूणाचे नाव आहे.
आयएसबीटी येथे जाण्यासाठी मेट्रो पकडली पण…
मृत विद्यार्थी मयंक गर्ग याने वल्लभगढ येथून मेट्रो पकडली आणि तो आयएसबीटी येथे जात होता. पण जवाहरलाल नेहरू मेट्रो स्टेशन जवळच त्याला हार्ट ॲटॅक आला आणि तो धा़कन खाली कोसळला. भर मेट्रोत घडलेल्या या प्रकारामुळे प्रवासी घाबरले. पण कोणीतरी प्रसंगावधान राखून त्याला मेट्रो स्टेशनबाहेर काढले आणि तातडीने मूलचंद रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
मयंक याचा भाऊ मनोज कुमार याने यासदंर्भात अधइक माहिती दिली. मयंक हा एमबीबीएसचा विद्यार्थी होता. शनिवारी तो पलवल येथून मेट्रोने आयएसबीटी येथे जात होता, मात्र त्याचा तो प्रवास अर्धवटच राहिला. आम्ही त्याला तातडीने रुग्णालयात नेलं, पण काही उपयोग झाला नाही. मयंक याने महाराष्ट्रातील वर्धा येथून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. रविवारी त्याला एका लेखी परीक्षेसाठी पंचकूला येथे जायचे होते, त्यासाठीच तो दिल्लीत गेला होता. मात्र त्याला ती परीक्षा देताच आली नाही.
अगदी फिट अँड फाईन होता मयंक, तरीही आला हार्ट ॲटॅक
अवघ्या 25 वर्षांचा असलेल्या मयंकला एक मोठा भाऊ आणि दोन बहिणी आहेत. त्याला तब्येतीची काहीच तक्रार नव्हती, अगदी फिट अँड फाईन होता. मात्र तरीही त्याला अचानक हार्ट ॲटॅक आला आणि तोच जीवघेणा ठरला. त्याच्या अकस्मात मृत्यूमुळे गर्ग कुटुंबियांवर दुत:खाचा डोंगर कोसळला आहे. तो मूळचा हरियाणातील रहिवासी होता. अतिशय कष्टाने, अभ्यास करून, मेहनत करून त्याने एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. मात्र रुग्णांची सेवा करण्याचे त्याचे स्वप्न अधुरेच राहिले.