जोधपूर : डॉक्टर बनून गावकऱ्यांची सेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून जोधपूरहून मिझोरम येथे एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी गेलेल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाला. अनिता नागौर असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. जोधपूर शहरातील बीजेएस भागातील रहिवासी असलेली एमबीबीएस विद्यार्थिनी अनिता मिझोरममधील झोरम मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत होती. विशेष म्हणजे गावातील पहिली मुलगी अनिता हिने डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले होते. तिचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी अवघे काही दिवस उरले होते.
19 मार्चला अंतिम परिक्षा होती
अनिता नागौरच्या मेर्टा तालुक्यातील तालनपूर येथील रहिवासी होती. मात्र सध्या हे कुटुंब जोधपूरमध्ये राहते. 19 मार्च रोजी एमबीबीएसच्या अंतिम वर्षाची परीक्षा होणार होती. पण त्याआधी 8 मार्चला अनिताला कॉलेजमध्येच हृदयविकाराचा झटका आला, यात तिचा मृत्यू झाला. अनिता आपल्या गावातील पहिली महिला डॉक्टर होणार होती. 2018 मध्ये तिची NEET मध्ये निवड झाली होती.
अनिताचे वडील सोजत येथे पोलीस एएसआय म्हणून कार्यरत आहेत. एक भाऊ स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे, तर एक भाऊ भारतीय हवाई दलात तैनात आहे. परिक्षा झाल्यानंतर अनिता जोधपूरमध्ये इंटर्नशीप करणार होती. पण त्याआधीच नियतीच्या मनात काहीतरी वेगळे होते. पहिला महिला डॉक्टर होऊन गावात येण्याआधीच तिचा मृतदेह गावात आणण्याची दुर्दैवी वेळ आली.
अनिताचा 8 मार्च रोजी मृत्यू झाल्यानंतर ती शिकत असलेल्या जोरम महाविद्यालयात दुसऱ्या 9 मार्च रोजी परिक्षा रद्द करण्यात आल्या होत्या.