नवी दिल्ली | भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन शनिवार (आज) आणि रविवारी नवी दिल्लीमध्ये सूरू आहे. या अधिवेशनाला देशभरातून कार्यकर्ते उपस्थित राहिले आहेत. महाराष्ट्रातील भाजपच्या प्रमुख नेते दिल्लीमध्ये आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर आली असून खासदार प्रीतम मुंडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.
खासदार प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वीस मिनिटे बैठक झाली. बैठकीचे कारण अस्पष्ट आहे, केंद्रीय मंत्री रावसाहेव दानवे यांच्या बंगल्यामध्ये ही बैठक झाली. बैठकीनंतर प्रीतम मुंडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मंत्री भारती पवार, रावसाहेब दानवे, भागवत कराड, गिरीश महाजन, पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला.
राजकारणात माझ्यासोबत दगाफटका, माझा वनवास झाला. तुमचं प्रेम पाहण्यासाठीच हे सर्व झाल्याचं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी सध्या ‘गाव चलो अभियान’ मध्ये केलं होतं. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याचं बोललं जात आहे. आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत एकत्र आले आहेत. धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या गटात असल्याने पंकजा मुंडे येत्या विधानसभेमध्ये कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार? असा सवाल उपस्थित झाला आहे. यामध्ये सर्वात जास्त पंकजा मुंडे यांची गोची झाली आहे. त्यामुले नेमकी बैठक कशानिमित्त झाली यावर अद्याप प्रश्नचिन्हच आहे.