मुंबई : गेल्या काही दिवसांपासून (Milk producer) दूध उत्पादकांना अच्छे दिन येत आहेत. तीन महिन्यांपूर्वीच (Milk Rate Hike) दुधाच्या दरात वाढ झाली होती. त्यानंतर आता पुन्हा (Amul Milk) अमूल आणि मदर दुध डेअरीच्या दरात वाढ झाली आहे. लिटरमागे 2 रुपयांनी दर वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला 3.5, 8.5 या फॅटसाठी लिटरमागे 37 रुपये मिळतील असा अंदाज आहे. उद्यापासून म्हणजेच 17 ऑगस्टपासून हे वाढीव दर लागू होणार आहेत. यासबंधी अमूल आणि मदर डेअरीने अधिकृतपणे सांगितले आहे. त्यामुळे त्याचा फायदा आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच होणार. मात्र, सर्वसामान्यांना महागाईचा सामना हा करावा लागणार हे वेगळेच.
17 ऑगस्टपासून अमूल दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून दूध विकत घेतल्यानंतर त्यावर प्रक्रिया केल्यानंतर नव्या किमतीनुसार आता अमूल शक्ती दूध हे 50 रुपये लिटर, अमूल गोल्ड 62 रुपये प्रति लिटर आणि अमूल ताजा 56 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध होणार आहे. फेडरेशनच्या म्हणण्यानुसार, अहमदाबाद आणि गुजरातमधील सौराष्ट्र विभाग, दिल्ली एनसीआर, पश्चिम बंगाल, मुंबई इत्यादी ठिकाणी नवीन किंमती लागू होतील.
अमूल सोबतच मदर डेअरीनेही दुधाचे दर वाढवले आहेत. मदर डेअरीने दिल्ली एनसीआरमध्ये बुधवारपासून प्रति लिटर 2 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. या वाढीनंतर फुल क्रीम दुधाला 61 रुपये, टोन्ड दुधाला 51 रुपये प्रति लिटर आणि डबल टोन्डला 45 रुपये, तर गाईच्या दुधाला आता 53 रुपये प्रतिलिटर मोजावे लागणार आहेत. स्थानिक पातळीवर मात्र फॅटनुसार दर हे ठरवून दिले गेले आहेत.
तीन महिन्यानंतर दुधाचे दर हे 2 रुपयांनी वाढले असले तरी पशूखाद्याचे दर हे महिन्यातून एकदा वाढतात. त्यामुळे दुग्धव्यवसया वाटतो तेवढा सोपा राहिलेला नाही. शिवाय वाहतूकीचा खर्च हा वाढत आहे. इंधनाचे दर वाढले की त्याचा परिणाम इतर बाबींवरही होतोच त्याचप्रमाणे दुधाचे दर वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी सामान्य माणसाला पुन्हा एकदा महागाईचा फटका बसला आहे.