नवी दिल्ली : मुंबईतून 20 वर्षांपूर्वी दुबईत घरकामासाठी गेलेली महिला पाकिस्तानात सापडली आहे. सोशल मीडिया (Social Media)मुळे 20 वर्षे बेपत्ता (Missing) असलेल्या महिलेचा कुटुंबीयांशी संपर्क (Contact) झाला आहे. दुबईत कामानिमित्त गेल्यानंतर या महिलेचा कुटुंबीयांशी काहीच संपर्क नव्हता. कुर्ल्यात राहणारी हमीदा बानो (70) ही महिला 2002 मध्ये दुबईत घरकाम करण्यासाठी भारत सोडून गेली. मात्र ती दुबईत पोहचलीच नाही. एजंटने तिने दुबईऐवजी पाकिस्तानातील हैदराबाद शहरात सोडले. त्यानंतर तब्बल 20 वर्षे महिला बेपत्ताच होती. अखेर सोशल मीडियाच्या मदतीने महिलेच्या कुटुंबीयांचा शोध लावण्यास यश आले आहे. पाकिस्तानच्या हैदराबाद शहरात सध्या महिला वास्तव्यास आहे. महिलेला भारतात परत आणण्यासाठी कुटुंबीय प्रयत्न करत आहेत.
महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील एक सामाजिक कार्यकर्ता वलीउल्लाह मारूफ यांनी एकदा बानोची भेट घेतली. यावेळी बानेने सांगितले की, मुंबईतील एका एजंटने 20 वर्षांपूर्वी दुबईमध्ये काम देण्याचे आश्वासन देऊन तिची फसवणूक केली आणि तिला शेजारच्या देशात पाकिस्तानात आणले. बानो पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील एक प्रमुख शहर हैदराबाद येथे राहत होती. तेथे तिने एका स्थानिक पुरुषाशी लग्न केले, ज्याच्यापासून तिला एक मूल आहे. मात्र नंतर तिच्या पतीचा मृत्यू झाला.
महिलेची कहाणी ऐकून आणि घरी परत जाण्याची तळमळ पाहून मारूफने बानोचा एक व्हिडिओ त्याच्या YouTube चॅनेलवर अपलोड केला. त्यानंतर त्याला मदत करू शकेल अशा मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्याचा शोध घेतला आणि शेवटी त्याला खफलान शेख नावाचा सामजिक कार्यकर्ता सापडला. त्यानंतर शेखने हा व्हिडिओ त्याच्या स्थानिक ग्रुपमध्ये प्रसारित केला आणि कुर्ल्यातील कसाईवाडा परिसरात राहणाऱ्या बानोची मुलगी यास्मिन बशीर शेख हिचा शोध घेतला. आपली आई 2002 मध्ये एका एजंटमार्फत घरकाम करण्यासाठी दुबईला गेली. मात्र, एजंटच्या निष्काळजीपणामुळे ती पाकिस्तानात पोहोचली. आम्हाला तिचा ठावठिकाणा माहित नव्हता आणि त्याच एजंटद्वारे फक्त एकदाच तिच्याशी संपर्क साधता आला, अशी माहिती बानो यांची मुलगी यास्मिनने सांगितली.
याआधीही बानो कतारला घरकामासाठी गेल्या होत्या. “आम्हाला आनंद आहे की, आमची आई जिवंत आणि सुरक्षित आहे. आता आम्हाला तिला परत आणण्यासाठी भारत सरकारने मदत करावी अशी आमची इच्छा आहे,” असे यास्मिन पुढे म्हणाली. बानो यांना सुरक्षितपणे घरी परत आणण्यासाठी कुटुंबाने पाकिस्तान उच्चायुक्तांकडे संपर्क साधला आहे. (Missing woman from Mumbai found in Pakistan through social media)