नवी दिल्ली: विधान परिषद निवडणुकीत (MLC Election 2022) मतदान करता यावं म्हणून राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक (nawab malik) आणि अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मलिक आणि देशमुख यांच्या वतीने राष्ट्रवादीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दुपारी या याचिकांवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायलयाकडून या दोन्ही नेत्यांना दिलासा मिळतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विधान परिषद निवडणुकीत मतदान करता यावं म्हणून या दोन्ही नेत्यांच्यावतीने राष्ट्रवादीने मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नाही. त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांचे अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी राज्यसभा निवडणुकीतही या दोन्ही नेत्यांना मतदान करण्याची परवानगी नाकारण्यात आली होती.
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत मतदानासाठी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची तात्पुरती सुटका करण्यास परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. दोन्ही नेते विद्यमान आमदार आहेत. दोघेही लोकप्रतिनिधी आहेत. दोघांवरही आरोप सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे त्यांना मतदान करण्याची परवानगी देण्यात यावी. मतदानापुरती या दोन्ही नेत्यांची तात्पुरती सुटका करण्यात यावी, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
राष्ट्रवादीकडे 53 मते आहेत. मात्र मलिक आणि देशमुख तुरुंगात असल्याने राष्ट्रवादीच्या मतांचा आकडा 51 झाला आहे. मात्र, राष्ट्रवादीकडे अपक्षांची तीन मते आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीची संख्या 54 झाली आहे. विधान परिषद निवडणुकीत उमेदवार विजयी होण्यासाठी 26 मतांची गरज आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडे दोन मते अतिरिक्त उरतात. ही दोन मते राष्ट्रवादीला काँग्रेसकडे वळती करता येणार आहे. मलिक आणि देशमुखांना मतदानाचा हक्क मिळाल्यास राष्ट्रवादीला काँग्रेसकडे चार अतिरिक्त मते वळती करता येणार आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांचा विजय सोपा होणार आहे.
काँग्रेसकडे 44 मते आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराला 17 मतांची गरज आहे. एमआयएमने एक मत काँग्रेसला देण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे काँग्रेसची मते 18 झाली आहेत. शिवसेनेने चार अतिरिक्त मते दिल्यास काँग्रेसची मते 22 वर पोहोचली आहेत. विजयासाठीची 4 मते राष्ट्रवादीकडून काँग्रेसला दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे भाई जगताप यांचं पारडं सध्या तरी जड दिसत आहे.
शिवसेनेकडे अपक्ष मिळून 62 मते आहेत. दोन उमेदवारांना 52 मते दिल्यानंतर शिवसेनेकडे अतिरिक्त मते उरतात. ही मते काँग्रेसच्या उमेदवाराकडे जाणार आहेत. तर, भाजपकडे 106 मते आहेत. भाजपला सहा अपक्षांचा पाठिंबा आहे. त्यामुळे भाजपच्या मतांची संख्या 112 इतकी झाली आहे. भाजपचे पाच उमेदवार मैदानात आहेत. त्यापैकी चार उमेदवार निवडून गेल्यानंतर 8 अतिरिक्त मते उरतात. प्रसाद लाड यांना विजयासाठी आणखी 18 मतांची गरज लागणार आहे. ही उणीव भाजप कशी भरून काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.