पश्चिम बंगाल | 5 जानेवारी 2024 : केंद्राच्या ईडी पथकाने येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या संस्थावर धाडी घातल्या असताना पश्चिम बंगालमध्ये कारवाई करण्यास गेलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांवर 200 जणांच्या जमावाने मोठा हल्ला केल्याची घटना घडली आहे. हा हल्ला इतका भयानक होता की अधिकाऱ्यांची डोकी फुटली त्यांच्या कारवर तूफान दगडफेक झाल्याने त्यांना आपला गाशा गुंडाळून पळून जावे लागले. पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी या हल्ल्याचे वर्णन भयानक हल्ला असे केले आहे. या प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना राज्यपालांनी नोटीस पाठविली आहे. आता तृणमुल कॉंग्रेसच्या या नेत्याच्या अटकेसाठी ईडी कोर्टात धाव घेणार आहे.
पश्चिम बंगालच्या तृणमुल कॉंग्रेसचे नेते शाहजहां शेख यांच्यावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांवर त्यांच्या सुमारे 200 समर्थकांनी हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर तुफान दगडफेक झाल्याने अधिकाऱ्याची टाळकी देखील फुटली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी रेशनिंग वितरण घोटाळ्याच्या चौकशीसाठी उत्तर 24 परगना जिल्ह्यातील शेख यांच्या घरावर धाड टाकण्याचा प्रयत्न केला होता.
पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगना जिल्ह्यातील संदेशखाली परिसरात शुक्रवारी सकाळी ईडीचे अधिकारी पोहचले. याची खबर लागताच शेख यांचे कार्यकर्ते जमू लागले. त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवर मोठा हल्ला केला. यात ईडीचे अनेक अधिकारी जखमी झाले. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत एसआरपीएफ आणि अर्धसैनिक दलाचे जवानही होते. परंतू जमावाची संख्या मोठी असल्याने काही उपयोग झाला नाही.
आता ईडीने टीएमसी नेते एस.के. शाहजहा यांच्या अटक वॉरंटसाठी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. टीएमसी नेते शाहजहा यांची लोकप्रियता प्रचंड असल्याने कार्यकर्त्यांना आवरण कठीण गेल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांच्या जमावाने केलेल्या हल्ल्यात दोन अधिकारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला टाके पडले आहेत. तर अन्य दोन अधिकारी किरकोळ जखमी झाले आहेत. आता शाहजहा यांच्या चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेणे गरजेचे असल्याने आता ईडीने कोर्टात जाऊन अटक वॉरंट आणण्याचा निर्णय घेतला आहे.
कोर्टात आज झालेल्या घटनेचा तपशिल देखील दिला जाणार आहे. या हल्ल्याच्या वेळी स्थानिक पोलिसांनी देखील योग्य सहकार्य केले नसल्याचा आरोप ईडीने केला आहे. या प्रकरणात सरकारी कारवाईत अडथळा आणणे, सरकारी संपत्तीचे नुकसान करणे, अधिकाऱ्यांना मारहाण करणे याची तक्रार कोर्टात केली जाणार असल्याचे ईडीने म्हटले आहे. पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून या परिसरात केंद्रीय पथक तैनात करण्याची विनंतीही कोर्टाला केली जाणार आहे.