छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि क्रूरकर्मा औरंगजेब या तिघांभोवती राज्याचंच नाही तर देशाचं राजकारण फिरत आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून महापुरूषांच्या नावाने राजकारण करण्यात येत आहे. त्याआधारे स्वत:ची पोळी भाजण्याचा प्रकार राजकारणी करत आहेत. यापूर्वी शिवराय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साम्य स्थानं शोधण्याचा प्रयत्न झाला. तर आता या भाजपा खासदारने अकलेचे तारे तोडले. ओडिशातील या खासदाराच्या दाव्यावर वाद पेटण्याची शक्यता आहे.
“मागील जन्मात मोदी हे छत्रपती शिवराय”
ओडिशातील बारगडचे भाजपा खासदार प्रदीप पुरोहित यांनी बजेट सत्रात वादग्रस्त विधानाने मोठा दिवा लावला. छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संबंध जोडण्यासाठी त्यांनी अकलेचे तारे तोडले. गेल्या जन्मात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच छत्रपती शिवराय असल्याचा दावा त्यांनी केला. संसदेत बोलताना त्यांनी सर्व मर्यादा सोडल्या. त्यांच्या या विधानाने आता मोठा वाद उफळला आहे. पीएम मोदी हेच वास्तवात शिवराय होते, त्यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला विकास आणि प्रगती पथावर नेण्यासाठी पुन्हा जन्म घेतल्याचा अजब दावा पुरोहित यांनी केला. त्यासाठी त्यांनी ओडिशातील गिरीजाबाबा या संताचा आधार घेतला. या संतांनीच, या बाबानीच आपल्याला ही माहिती दिल्याचे पुरोहित म्हणाले.
या वक्तव्याचा जोरदार समाचार
भाजपा खासदाराने तोंडाच्या वाफा दवडल्यानंतर आता त्यांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार इंटरनेटवर घेण्यात येत आहे. काँग्रेससह अनेक नेत्यांनी त्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. सोशल मीडियावर तर पुरोहितांना लोकांनी चांगलाच आरसा दाखवला. हे वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे स्वराज्य, त्यांची महानता, त्यांचा आदर्श यांचा अवमान करणारे असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे. पुरोहितांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात येत आहे.
अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान करण्याचे आणि महाराष्ट्रातील तसेच जगभरातील शिवप्रेमींची अस्मिता दुखावण्याचे नियोजनबद्ध कारस्थान भाजपच्या नेतेमंडळींकडून केले जात आहे.
या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा जिरेटोप… pic.twitter.com/N624xkfkQN
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) March 17, 2025
काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी या वक्तव्यावर जोरदार टीका केली. शिवरायांचा वारंवार अपमान करण्यात येत असल्याचे सांगत, त्यांनी या वक्तव्याचा जाहीर निषेध केला आहे. शिवरायांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
औरंगजेबाच्या कबरीवरून वाद
एकीकडे औरंगजेबाच्या कबरीवरून मुद्दाम वाद पेटवण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. समाजसमाजात तेढ निर्माण करण्यासाठी इतिहासातील गढे मुडदे बाहेर काढण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यातच आता पुरोहित यांच्या वक्तव्याने या आगीत तेल ओतल्या गेले आहे. असे वाद समाजाला परवडणारे नसल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. तर हा वाद आताच कसा पेटवण्यात येत आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.