नवी दिल्ली | 9 फेब्रुवारी 2024 : कोव्हिडच्या काळात देश संकटातून जात होता. त्यावेळी विरोधकांना राजकारण करण्याची गरज नव्हती. पण विरोधक राजकारण करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला बोलावून घेऊन काही गोष्टी सांगितल्या. विरोधकांनी कितीही राजकारण केलं तरी आपल्याला राजकारण करायचं नाही. लोकांना वाचवणं हे आपलं प्राधान्य आहे, असं मोदींनी आम्हाला सांगितलं होतं. विरोधकांच्या राजकारणामुळे मोदी व्यथित होत होते, असं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने आयोजित केलेल्या सुशासन महोत्सवात आरोग्य मंत्री मनसुख मांडविया बोलत होते. अनुराग मुस्कान यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी देशातील कोव्हिडच्या काळातील परिस्थितीचं वर्णन करतानाच सरकारने केलेल्या कामाची माहितीही दिली. मी सुरुवातीपासूनचा कोव्हिडचा साक्षीदार आहे. कोव्हिड आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ मंत्र्यांचे गट तयार केले होते. आम्हाला अनेक सूचना केल्या होत्या. रोज त्यांची तज्ज्ञांसोबत बैठक होत होती. जगात काय चाललंय, आपल्या देशाची, देशातील राज्यांची परिस्थिती आणि जागतिक आरोग्य संघटनेने काय काय सुरू केलं आहे, याचं सादरीकरण व्हायचं आणि त्यानंतर तात्काळ निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली, असं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं.
भारत मोठा देश आहे. भारतात आरोग्य सेवा व्यवस्थित नाही. त्यामुळे कोव्हिडमुळे भारतात मोठा हाहा:कार उडेल, भारताचं प्रचंड नुकसान होईल असं जगाचं म्हणणं होतं. अशावेळी मोदींनी पहिली मोठी मिटिंग आयोजित केली. देशातील शास्त्रज्ञांशी चर्चा केली. आपल्याकडे हा व्हायरस आल्यावर त्यावर मात कशी करायची हे मोदींनी शास्त्रज्ञांना विचारलं? पण त्यावर शास्त्रज्ञांकडे उत्तर नव्हतं. मात्र आपण व्हॅक्सिन काढणं हाच पर्याय असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. मोदींचा देशाच्या क्षमतेवर विश्वास होता. या देशात क्षमता आणि बौद्धिकतेची कधीच कमी नव्हती. पण त्याचा वापर कधीच झाला नाही. मोदींनी शास्त्रज्ञांना व्हॅक्सिन तयार करायला सांगितली. तुम्ही कामाला लागा. यश तुमचं असेल, अपयश मोदींचं असेल असं मोदी म्हणाले होते. त्यामुळे शास्त्रज्ञांचा आत्मविश्वास वाढला, असंही मांडविया म्हणाले.
कोरोना हे खूप मोठं आव्हान होतं. देशात 24 मार्चला लॉकडाऊन लागला होता. 4 एप्रिल रोजी मोदींचा संध्याकाळी मला फोन आला. त्यांनी मला विचारलं देशात मेडिसीनची काय स्थिती आहे? मी सांगितलं गरजेच्या मेडिसीन आहेत. आपण लसीची निर्मितीही करू शकतो. तेव्हा मोदी म्हणाले की, आपण जगाचा विचार करणारे लोक आहोत. लोकांसाठी आरोग्य हा व्यवसाय असेल, पण आपल्याकडे आरोग्य ही सेवा आहे. त्यामुळे सर्व फार्मा कंपन्यांना मेडिसीन उत्पादन करण्यास सांगा. जगातून फोन येत आहेत. त्यांना आपल्याकडून औषधे हवी आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
आपण औषधे उत्पादन करू शकतो का? हे मोदींनी विचारलं मी हो म्हणून सांगितलं. त्यानंतर आपण आव्हान स्वीकारलं आणि लस तयार करण्याचं काम सुरू केलं. त्यावेळी देशात विमानतळ बंद होतं. पण रोज 7 ते 10 विमान भारतात उतरत होते. आपण 150 देशात आपण औषधांचा पुरवठा केला. संपूर्ण जगाने आपलं कौतुक केलं, असंही त्यांनी सांगितलं.