दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगर येथील राऊस आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात अचानक पाणी साचले. तळघरातील असलेल्या लायब्ररीमध्ये 30 हून अधिक विद्यार्थी शिकत होते. मात्र, अचानक नाल्याचे पाणी तळघरात भरले त्यामुळे हे विद्यार्थी तेथे अडकले. या दुर्घटनेत तीन यूपीएससी परीक्षार्थींचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये उत्तर प्रदेशातील श्रेया यादव, तेलंगणातील तान्या सोनी आणि केरळमधील नवीन दलविन यांचा समावेश आहे. कोचिंग सेंटरच्या या दुर्घटनेनंतर गृह मंत्रालयाने एक समिती स्थापन केली आहे. ही समिती अपघाताची कारणे शोधून जबाबदारी निश्चित करेल. त्यावर उपाय सुचवेल आणि धोरणात्मक बदलांची शिफारस करणार आहे.
गृह मंत्रालयाने स्थापन केलेल्या या समितीमध्ये गृह मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव, दिल्ली सरकारच्या गृह विभागाचे प्रधान सचिव, दिल्ली पोलिसांचे विशेष आयुक्त, अग्निशमन सल्लागार आणि गृह मंत्रालयाचे संयुक्त सचिव यांच्यासह अनेक प्रमुख अधिकारी आहेत. दरम्यान, दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
दिल्लीचे उप राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या तीन यूपीएससी उमेदवारांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. राजभवनाने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. दरम्यान, उप राज्यपाल यांनी या घटनेबद्दल चिंता दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांनी जे या घटनेला जबाबदार असतील अशा दिल्ली अग्निशमन सेवा, पोलीस आणि दिल्ली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर 24 तासात कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
कोचिंग सेंटरमधील अपघातानंतर दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई सुरु करण्यात आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत तळघरांमध्ये असलेली डझनभराहून अधिक कोचिंग सेंटर्स सील केली आहेत. तर, एमसीडीने अशी कोचिंग सेंटर्स तोडण्याची कारवाई सुरु केली आहे. विशेषत: अतिक्रमणे करण्यात आलेल्या जागांवरही कारवाई करण्यात आली आहे.