प्रयागराज : डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात ब्लड प्लाज्मा ऐवजी मोसंबी ज्युस चढवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील एका रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. यात रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहितीही समोर येत आहे. उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिला आहेत. तसेच दोषींवर कडक करावाई करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
यासंबंधीचा एक व्हिडिओही ट्विटरवर व्हायरल झाला आहे. हे प्रकरण प्रयागराजच्या झालवा येथील ग्लोबल हॉस्पिटलमधईल असल्याचा दावा या व्हिडिओद्वारे केला जात आहे.
येथे दाखल झालेल्या रुग्णाला रक्ताच्या प्लाझ्माऐवजी मोसंबी ज्युस देण्यात आल्याचे सांगीतले जात आहे. संबधीत रुग्णाचा मृत्यू झाल्याचा दावाही केला जात आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाकडून याला दुजोरा मिळालेला नाही.
या प्रकरणानंतर डेंग्यूच्या रुग्णांना बनावट प्लाझ्मा पुरवल्याचा जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे प्रयागराजचे आयजी राकेश सिंह यांनी सांगितले.
याप्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी एका बनावट रक्तपेढीचाही पर्दाफाश झाला आहे.
प्लाझ्माऐवजी पुरवठा करण्यात आलेली वस्तू मोसंबी ज्यूस आहे की नेमकं आहे याबाबत स्पष्टपणे काहीही सांगता येणार नाही असेही राकेश शर्मा म्हणाले.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांचे एक पथक संबधीत रुग्णालयात दाखल झाले आहे. तपास अहवाल समोर आल्यानंतर दोंषीवर कारवाई केली जाणर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
प्रयागराजमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तेथील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 500 च्या वर पोहोचली आहे.