विविध धर्म, अनेक पंथ अन् असंख्य जाती अन् त्यातली एकता- एकोपा ही भारत देशाची ओळख. विविध धर्म आणि जाती असतानाही गुण्यागोविंदाने नांदणारा देश अशी भारताची जगभरात ओळख आहे. पण या सगळ्याला छेद देणारं विधान हिमाचलमधील मंडी लोकसभा मतदारसंघाच्या भाजप खासदार कंगना रनौत यांनी केलं आहे. भारत देशात केवळ तीनच जाती आहेत, असं त्या म्हणाल्या आहेत. कंगना या खासदार असण्यासोबतच प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. देशाच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीवर आधारित कंगना यांचा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्त कंगना मुलाखती देत आहेत. अशाच एका मुलाखती दरम्यान कंगना यांचं विधान सध्या चर्चेत आहे.
आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. की गरीब, शेतकरी आणि महिला या तीनच जाती आहेत. या पलिकडे कोणतीच जात नाही. महिला या मागास आहेत. शेतकरी जे अन्नदाता आहेत. त्यामुळे गरीब, शेतकरी आणि महिला या तीनच जाती आहेत, असं कंगना यांनी म्हटलं. पण एखादी व्यक्ती दलित आहे, एखादी व्यक्ती आदिवासी आहे म्हणून त्यांची हत्या होते, यावर तुमचं काय मत आहे? असा सवाल करण्यात आला. तेव्हा दलित हे पण गरीब आहेत. त्याचमुळे आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामनाथ कोविंद यांना पहिलं राष्ट्रपती केलं. आदिवासी असणाऱ्या द्रौपदी मूर्मू यांनाही राष्ट्रपती केलं, असं कंगना रनौत यांनी म्हटलं आहे. दरम्यान, के.आर. नारायणन हे देशाचे पहिले दलित राष्ट्रपती होते.
जातीय जनगणना करण्याची मागणी विरोधी पक्षांकडून वारंवार केली जात आहे. याचबाबत कंगना यांना प्रश्न विचारण्यात आला. जातीय जनगणनेबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जे म्हटलं त्याला माझं समर्थन आहे. सोबत राहिलो तर नीट राहू. आपण विभागले जाऊ तर कापले जाऊ… अजिबात जातीय जनगणना नाही व्हायला हवी. मी जातीपाती मानत नाही. माझ्या सहकलाकारांची, आजूबाजूच्या लोकांची कोणती जात आहे हे मला माहिती नाही. जातीय जनगणना व्हायला नाही पाहिजे, असं कंगना रनौत यांनी म्हटलं आहे.
शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या, असं विधान कंगना रनौत यांनी केलं होतं. त्यावरून भाजपच्या वरिष्ठांनी त्यांची कानउघडणी केली आहे. कंगना राणावतने केलेल्या वक्तव्याचा भाजप पक्षाशी संबंध नाही, असं अधिकृत पत्रही भाजप पक्षाकडून जाहीर करण्यात आलं आहे.