दिल्ली : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचे धाकटे भाऊ आणि राजस्थानमधील कोटा-बुंदी लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेंद्र बिर्ला यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात नरेंद्र बिर्ला हे गंभीर जखमी झाले आहेत. कोटाहून दिल्लीला जात असताना जयपूर-दिल्ली महामार्गावरील पलवल गावाजवळ मंगळवारी रात्री हा अपघात झाला. नरेंद्र बिर्ला यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना मंगळवारी रात्रीची असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र बिर्ला हे मंगळवारी रात्री कोटा येथून आपल्या कारने दिल्लीला चालले होते. जयपूर-दिल्ली महामार्गावरील पलवल गावाजवळ नरेंद्र बिर्ला यांची कार आली असता ती उलटली. कार पलटी झाल्यानंतर मोठा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळाकडे धावले. लोकांनी गाडीतून जखमींना बाहेर काढत नजीकच्या अरवल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले.
अरवाल रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी बिर्ला यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात रेफर केले. कोटा-बुंदी लोकसभा मतदारसंघाचे खासदार, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कॅम्प ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी या अपघाताला दुजोरा दिला आहे. स्पीकर ओम बिर्ला यांच्या कॅम्प ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी नरेंद्र बिर्ला यांना दोन दिवस देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अपघाताच्या वेळी नरेंद्र बिर्ला यांच्या कारचा चालक झोपेत होता, अशी माहिती ओम बिर्ला यांच्या कॅम्प ऑफिसच्या सूत्रांनी सांगितले. मात्र नरेंद्र बिर्ला यांची गाडी कशी उलटली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा अपघात झाला त्यावेळी कारमध्ये चालक आणि नरेंद्र बिर्ला यांच्यासह अन्य काही लोकही प्रवास करत होते. या अपघातात नरेंद्र बिर्ला, चालक व इतर प्रवासी जखमी झाले आहेत. कार चालकासह सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.