नवी दिल्ली: कर्नाटकाने जो निषेध ठराव केला. त्याच पद्धतीने महाराष्ट्र सरकारने सोमवारी कर्नाटकाचा निषेध ठराव मांडून मंजूर करावा. ते माझ्यावर आणि जयंत पाटलांवर खटला दाखल करू पाहत आहेत. तुम्ही माझ्यावर खटले काय दाखल करता? कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर खटले दाखल करा. तुम्ही महाराष्ट्राचे पाईक असाल तर बोम्मईंवर खटले दाखल कराच. महाराष्ट्राचा अपमान केल्याबद्दल आणि चिथावणी दिल्याबद्दल बोम्मईंवर खटले दाखल करा, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारला ललकारले.
महाराष्ट्र आणि कर्नाटकात आग लावण्याचे काम बोम्मई करत आहेत. दिल्लीत गृहमंत्र्यांसमोर जे ठरले होते. ते ते मानायला बोम्मई तयार नाहीत. आपल्याच पक्षाच्या नेत्याचे आदेश मानत नाहीत. ते आमचे संस्कार आणि संस्कृती काढत आहेत. त्यांनी आमचे संस्कार काढण्याची गरज नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची तोंडं बंद आहेत. त्यामुळे बोम्मई यांची जीभ वळवळतेय, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
काल विधानसभेत अनावश्यक विषयावर चर्चा झाली. खोके आमदार व्यक्तीगत विषयावर बोलत होते. कर्नाटक सरकारने निषेध ठराव मंजूर केला हे त्यांना माहीत नाही हे दुर्देव आहे. आम्हाला कर्नाटकाची जमीन नको. वाद नको. आम्ही बेळगाव आणि निपाणीसह 856 गावे मागत आहोत. हा कायदेशीर दावा आहे. तो फायदेशीर दावा नाही. कायद्याच्या भाषेत आम्ही बोलत आहोत. पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तोंड शिवून बसले आहेत, असा हल्ला त्यांनी चढवला.
दोन्ही राज्यात सांस्कृतिक वाद नाही. हा वाद जनतेत नाही. राजकीय नाही. दोन राज्यात नाही. हा बोम्मईंनी तयार केलेला वाद आहे. देशाच्या गृहमंत्र्यांसमोर ठरलेली गोष्ट का मानत नाही? घटनादत्त अधिकार तुम्हालाच आहे का? आम्हाला नाही का? आम्हाला विरोध करण्याचा अधिकार आहे, असंही ते म्हणाले.
कर्नाटकाच्या ठरावात ज्या प्रकारची भाषा केली गेलीय. तशी भाषा कर्नाटकातील कोणत्याच सरकारने केली नव्हती. ते अशी भाषा करू शकतात. कारण महाराष्ट्रात दुबळे सरकार आहे. दुबळे मुख्यमंत्री बसले आहेत, अशी टीका त्यांनी केली.
कर्नाटक राज्य सांगली, सोलापुरात करतंय त्याच पद्धतीने तुम्ही असं करणार असाल तर आम्हाला त्याच मार्गाने काम करावे लागेल असं मी म्हटलं. तुम्हाला चीनचा एवढा तिटकारा असेल तर तुम्ही आधी तुमच्या पंतप्रधानांचा निषेध करा. त्यांनीच चीनचे दरवाजे उघडले आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
जर ते आम्हाला चीनचे एजंट म्हणत असतील तर चीनच्या पंतप्रधानांना, राष्ट्रप्रमुखांना अहमदाबादमध्ये बोलावून झोपाळ्यावर झुले देऊन, पापडी गाठिया खायाला घालून त्यांचा सन्मान करणाऱ्यांना काय म्हणाल? आम्ही चीनचे एजंट कसे? असा सवालही त्यांनी केला.