नवी दिल्ली: दिशा सालियन प्रकरणात माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना घेरणारे शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. राहुल शेवाळे म्हणजे देशाचे अॅटर्नी जनरल नाहीत. उद्या ते 2024 ला संसदेत दिसणार नाहीत. मला त्यांच्याबद्दल सांगू नका. आम्हाला कायदा कळतो. आम्ही 20 वर्ष संसदेत आहोत. आम्ही कायदा बनवणारे आहोत. आम्हीही राज्यात सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे कायदा आम्हालाही कळतो, असं संजय राऊत मीडियाशी बोलताना म्हणाले.
संजय राऊत यांनी क्लिनचीटच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी क्लिनचीट देण्याचा कारखाना काढला आहे. उद्या ते कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मईंनाही क्लिनचीट देतील. उद्या दाऊदने भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यालाही क्लिनचीट मिळेल. अबू सालेम तुरुंगात आहे. त्याने पत्र लिहून भाजपबद्दल बरं बोलला तर त्यालाही क्लिनचीट देतील.
भाजपच्या राज्यात कुणालाही क्लिनचीट मिळू शकते. विरोधकांना गुन्हेगार ठरवलं जाऊ शकतं. मला क्लिनचीटचं फार आश्चर्य वाटत नाही. हा क्लिनचीटचा कारखाना आहे. आणि दिलासा घोटाळा या सूत्रीवरच हे राज्य चाललं आहे, असा हल्लाच संजय राऊत यांनी भाजपवर चढवला.
शिंदे सरकारला अनेक शेपट्या फुटल्या आहेत. ते शेपट्या आत घालत आहेत. त्यांच्याकडे स्वाभिमान राहिला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
याची एसआयटी लावताय, त्याला एसआयटी लावताय, याला क्लिनचीट देता, त्याला क्लिनचीट देता. उद्या तुम्ही बोम्मईंनाही क्लिनचीट द्याल. आणि 20 लाख बांधावांना गुन्हेगार ठरवाल. बोम्मईंवर खटला दाखल करा ना. आमच्यावर खटला दाखल करता, बोम्मईवर करा, असं आव्हानच त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला दिलं.
दरम्यान, राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केला होता. रिया चक्रवर्तीला 44 फोन आले होते. AU या नावाने हे फोन आले होते. हे AU कोण आहेत? याची चौकशी करा, अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली होती. तसेच या नावाचा आदित्य ठाकरे यांच्या नावाशीही संबंध जोडण्यात आला होता. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं.
काल दिशा सालियन प्रकरणाचे विधानसभेतही पडसाद उमटले. यावेळी दिशा सालियन प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले होते.