मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सुरूवातीचे अंडरग्राऊंड स्थानक असलेल्या बीकेसी ते शीळफाटा या 21 किमी बोगद्याच्या बांधकामासाठी आर्थिक निविदा उघडण्यात आली आहे. या 21 किमीच्या बोगद्यापैकी 7 किमीचा बोगदा ठाण्याच्या खाडीखालून जाणार असून तो देशातील समुद्राखालील पहिला बोगदा ठरणार आहे. सी-2 पॅकेजच्या या कामासाठी दोन कंपन्यांनी निविदा भरली असून मे.अफ्कॉन्स ( M/s Afcons ) इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने सर्वात कमी बोली लावली आहे.
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी नॅशनल हाय स्पीड रेल कॉरिडोर लिमिटेडने ( NHSRCL ) निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. सी-2 पॅकेजसाठी आर्थिक निविदा उघडण्यात आली आहे. दोन कंपन्यांनी निविदा भरली आहे. सर्वात कमी बोली M/s Afcons कंपनीने लावली आहे. तांत्रिक निविदा येत्या 9 फेब्रुवारी रोजी उघडली जाणार आहे.
508 कि.मी. लांबीच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे सुरूवातीचे स्थानक बीकेसी येथे भूमिगत स्वरूपात बांधले जाणार जाणार आहे. बीकेसी स्थानक ते शिळफाटापर्यंत 21 किमीचा बोगदा खणण्यासाठी टनेल बोअरिंग मशीन ( TBM ) आणि न्यू ऑस्ट्रीयन टनेलिंग पद्धत ( NATM ) अशा दोन्ही पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. ( पॅकेज सी -2 ) ठाण्याच्या खाडीत ( Interdidal Zone ) समुद्राखाली खणण्यात येणारा 7 किमीचा बोगदा हा देशातील पहिला समुद्राखाली बोगदा ठरणार आहे.
एकाच बोगद्यातून दोन बुलेट धावणार
बुलेट ट्रेनसाठी खोदण्यात येणारा बोगदा अप आणि डाऊन अशा दोन्ही ट्रॅकसाठी एकच असणार आहे. सी – 2 पॅकेजमध्ये बोगद्याच्या जवळ आसपास 37 ठिकाणावर 39 इक्विपमेंट रूमची निर्मिती केली जाणार आहे. बोगद्यासाठी 13.1 मीटर व्यासाच्या कटर हेड वाल्या टीबीएम मशिनचा वापर केला जाणार आहे. खरे तर शहरातील एमआरटीएस – मेट्रोच्या बोगद्यांसाठी 5-6 मीटर व्यासाच्या कटर हेडचा वापर केला जात असतो.
पारसिक डोंगराखाली 114 मीटर खोलीचा मार्ग
बोगद्याच्या 16 किमी भागासाठी तीन टनेल बोअरिंग ( TBM ) मशीनचा वापर केला जाणार आणि उर्वरित 5 किमीच्या भागासाठी न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धत ( NATM ) वापरली जाईल. हा बोगदा जमीनीपासून सुमारे 25 ते 65 मीटर खोल असणार आहे. आणि त्याचा सर्वात खोल भाग शिळफाटाजवळ पारसिक डोंगराच्या खाली 114 मीटर जमीनीखाली असणार आहे. बीकेसी , विक्रोळी आणि सावळीमध्ये अनुक्रमे 36, 56 आणि 39 मीटर खोलीवर तीन शाफ्ट टाकण्यात येणार आहेत. घनसोलीत 42 मीटरचा इंक्लिनेड शाफ्ट आणि शिळफाटामध्ये टनेल पोर्टल एनएटीएममार्फत सुमारे 5 किमी बोगद्याचे काम होणार आहे.