मुंबई ते अहमदाबाद महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन एकूण 24 नदीपुलांवरुन धावणार आहे. गुजरात राज्यातील वलसाड जिल्ह्यातील कोलक नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले आहे. एकूण 24 नदीपुलांवरुन बुलेट ट्रेन जाणार आहे. यातील नऊ नदी पुलांचे काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्रात नद्यांवर चार पुलांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यात दोन पुलांची उभारणी उल्हास नदीवर तर एका पुलाची उभारणी वैतरणा नदीवर अन्य एका पुलाची उभारणी जगनी नदीवर होत असून या तिन्ही नद्या पालघर जिल्ह्यातील आहेत. बुलेट ट्रेनचा बिलीमोरा ते सुरत असा पहिला टप्पा साल 2026 मध्ये सुरु होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी कोलक नदीवरील नदी पुलाचे काम पूर्ण झाल्याचे नॅशनल हाय स्पीड रेल कॉरीडॉरने म्हटले आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील कोलक नदीवरील या नदीपूलाची बांधणी सुरु होती आता तो पूर्ण झाला आहे. या कोलक नदीवरील पुलाचे वैशिष्ट्ये म्हणजे या पुलाची लांबी 160 मीटर इतकी आहे. यात चार फूल स्पॅन गर्डरचा ( प्रत्येकी 40 मीटर ) वापर करण्यात आला आहे. पिअर्सची उंची 14 ते 23 मीटर इतकी आहे. एका खांबाचा व्यास पाच मीटर तर अन्य एका खांबाचा व्यास चार मीटर इतका मोठा आहे. हा नदीपूल वापी आणि बिलिमोरा बुलेट ट्रेन स्थानकादरम्यान आहे. दोन स्थानकांदरम्यान औरंगा आणि पार नदी अशा दोन नद्या आहेत. कोलक नदी वालवेरीजवळील सापुतारा डोंगरातून उगम पावते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते. कोलक नदी वापी बुलेट ट्रेन स्थानकापासून 7 किमी अंतरावर आणि बिलिमोरा बुलेट ट्रेन स्थानकापासून 43 कि.मी. अंतरावर आहे. 350 मीटर लांबीचा आणि 12.6 मीटर व्यासाचा पहिला बोगदा गुजरातमधील वलसाड येथील झारोली गावाजवळ पूर्ण झाला असून तो डोंगरातून जातो.
महाराष्ट्रात बुलेट ट्रेनची चार स्थानके आहेत. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीचे महाराष्ट्रातील सुरुवातीचे स्थानक बीकेसी येथे आहे. या अंडरग्राऊंड स्थानकासाठी मोठा खड्डा खणण्याचे काम पूर्ण झाले आहे. यात आता टीबीएम मशिन टाकण्यात येणार आहे. त्यानंतर दोन्ही बाजूंनी बोगदा खणण्याचे काम सुरु होणार आहे. बीकेसी आणि शिळफाटा येथील या बोगदा 21 किमी बोगद्याचे काम सुरु असून या बोगद्याचा 7 किमी भाग ठाणे खाडीच्या खालून जाणार आहे. त्यामुळे हा देशातील पहिला समुद्राखालील बोगदा ठरणार आहे. ठाणे, विरार आणि बोयसर स्थानकाची कामे सुरु आहेत. या उन्नत मार्गासाठी खांब उभारण्यासाठी 100 हून अधिक फाऊंडेशनची कामे अलिकडेच पूर्ण झाली आहेत. तर पालघर जिल्ह्यात डोंगरात पाच बोगदे खणण्याचे काम सुरु झाले आहे.