2008 मध्ये मुंबई दहशतवादी हल्ल्याने हादरली होती. या हल्ल्याचा कट पाकिस्तानमध्ये रचल्या गेला होता. 26 नोव्हेंबर 2008 मध्ये झालेल्या या हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वुर राणा याचा भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. भारताच्या स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट रोजी युएस कोर्ट ऑफ अपील फॉर नाईनथ सर्किटने याविषयीचा निर्णय दिला आहे. त्यानुसार राणाचे भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. पाकिस्तानला हा मोठा झटका मानण्यात येत आहे.
न्यायालय काय म्हणाले
पाकिस्तानी मूळ असलेला कॅनडाचा व्यावसायिक तहव्वुर राणा याला न्यायालयाचे निर्णयाने घाम फुटला आहे. भारताकडे आपल्याला सोपविण्यात येऊ नये, अशी विनंती त्याने न्यायालयाकडे केली होती. भारत आणि अमेरिका यांच्या प्रत्यार्पण करार अगोदरच अस्तित्वात आहे, त्यामुळे या करारानुसार राणा याला भारताला सोपवले जाऊ शकते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. या निर्णयाने पाकिस्तानला मात्र मिरच्या झोंबल्या आहे.
राणा लॉस एन्जिलिसमधील तुरुंगात
कॅलिफोर्निया येथील नाईंथ सर्किटच्या जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला 63 वर्षाच्या राणाने न्यायाधीशांच्या पीठाकडे अपिल दाखल केले आहे. राणा हा सध्या लॉस एन्जिलीसमधील तुरुंगात आहे. त्याच्यावर मुंबई दहशतवादी हल्ल्यातील लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडली याला मदत करण्याचा आरोप आहे. हेडली हा या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असल्याचे समोर आले आहे.
भारताने राणावर जे आरोप केले आहेत, त्यात आणि अमेरिकेत त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपात साम्य नाही. अमेरिकेत त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपातून त्याची सूटका झालेली आहे. पण भारताच्या प्रत्यार्पणाच्या याचिकेमुळे त्याची तुरुंगातून सूटका करण्यात आली नव्हती. गेल्या सात वर्षांपासून राणा हा तुरुंगात आहे.
मुंबई हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांचा मृत्यू
मुंबईत पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यामागे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना असल्याचा दावा करण्यात येतो. त्यासाठी अनेकांनी मदत केली होती. या हल्ल्यात एकूण 166 जणांना प्राण गमवावे लागले होते. यामध्ये काही परदेशी नागरिकांचा पण मृत्यू झाला. त्यात सहा अमेरिकन नागरिकांचा समावेश आहे. न्यायाधीशांच्या पीठाने राणावर जे आरोप लावण्यात आले आहे, त्याच्या पुढील तपासासाठी त्याचे प्रत्यार्पण आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. तीन न्यायाधीशाच्या पीठाने हा निकाल दिला आहे.