मुंबई | 22 फेब्रुवारी 2024 : देशाची पहीली मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच रुळांवर येण्याची शक्यता आहे. मुंबई ते अहमदाबाद हा बुलेट ट्रेनचा 508 किमी मार्ग बांधण्याचे काम वेगाने सुरु असून या ट्रेनचा पहिला टप्पा लवकरच सुरु होणार आहे. या मार्गासाठी डोंगरात बोगदे आणि नदीवर पुल बांधण्याचे काम सुरु आहे. बुलेट ट्रेनच्या कामासाठी गुजरात आणि महाराष्ट्रात जमीन संपादन करण्याचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे.
जपानच्या मदतीने देशातील पहिली बुलेट ट्रेन बांधण्याचे काम वेगाने सुरु झाले आहे. मुंबईच्या बीकेसी येथे या मार्गावरील पहिले आणि एकमेव अंडरग्राऊंड स्थानक बांधण्याचे काम सुरु आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा गुजरातच्या बिलीमोरा ते सुरत पर्यंत साल 2026 पर्यंत सुरु होणार असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईत या प्रकल्पाच्या बांधकाम साईटची पाहणी केल्यानंतर सांगितले. बुलेट ट्रेनच्या मार्गाचे विक्रोळी येथील काम पाहिल्यानंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की जर उद्धव ठाकरे यांच्या आधीच्या सरकारने वेळीच मंजूरी दिली असती तर बुलेट ट्रेन आधीच सुरु झाली असती.
भारताचा हा पहिलाच हायस्पीड रेल कॉरीडॉर योजना आहे. या प्रकल्पाचा उद्देश्य याचे डीझाईनची गुंतागुंत आणि क्षमता समजून घेणे हा आहे. या मार्गावरील पहिला टप्पा सुरत आणि बिलीमोरा दरम्यान जुलै-ऑगस्ट 2026 मध्ये बुलेट ट्रेन सुरु होणार आहे. या मार्गावर जपानची शिंकानसेन ट्रेन सिस्टीमचा वापर केला जाणार आहे. ही जगातील सर्वात सुरक्षित बुलेट ट्रेन प्रणाली म्हटली जाते.
मुंबईत बुलेट ट्रेनसाठी 21 किमी लांबीचा बोगदा खणला जात आहे. त्याचा 7 किमीचा भाग ठाण्याच्या खाडी खालून जाणार आहे. या बोगद्याचा पाण्याखालील सर्वात खोल बिंदू 56 मीटरवर असणार आहे. बोगद्याची रुंदी सुमारे 40 फूट इतकी आहे. यातून बुलेट ट्रेन दर ताशी 320 किमी वेगाने धावणार आहे.