कोलकाता : संगीत जगतातून एक अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध गायक राशिद खान (Rashid Khan) यांचे निधन झाले आहे. ते दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांना कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते ते ऑक्सिजन सपोर्टवर होते. भारतीय शास्त्रीय संगीतातील ते एक मोठे नाव होते आणि बॉलीवूडमध्येही त्यांचे अमुल्य योगदान होते. प्रापत माहितीनुसार, ते बऱ्याच काळापासून आजारी होते आणि गेल्या महिन्यातच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते हळूहळू बरे होत होते आणि सकारात्मक प्रतिसाद देत होते. रशीद खान यांचा जन्म उत्तर प्रदेशमध्ये झाला आणि त्यांनी त्यांचे आजोबा उस्ताद नासिर हुसेन खान यांच्याकडून संगीताचे प्रारंभिक धडे घेतले. ते उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे पुतणे होते. मुस्तफा खान यांनीच प्रथम आपल्या प्रतिभेची चाचणी घेतली आणि बदायूंनंतर त्यांचे संगीताचे प्रारंभिक प्रशिक्षण मुंबईत झाले.
संगीतविश्वात मोठ्या आदराने घेतल्या जाणाऱ्या नावामध्ये उस्ताद रशीद खान यांचे नाव आहे. 2004 मध्ये सुभाष घई यांच्या किसना या चित्रपटातून त्यांनी करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात त्यांनी तोरे बिन मोहे चैन नहीं आणि कहें उजाडी मोरी नींद ही गाणी गायली. त्यानंतर 2007 मध्ये शाहिद कपूरच्या ‘जब वी मेट’ या चित्रपटातून त्यांना विशेष ओळख मिळाली. आओगे जब तुम ओ साजना, नैना फुल खिलेंगे.. या गाण्यामुळे बरीच ओळख मिळाली.
‘आओगे जब तुम ओ साजना, नैना फुल खिलेंगे..’ घराघरात लोकप्रिय झाले. त्यांचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. पण इतर गायकांच्या तुलनेत त्यांनी बॉलिवूडमध्ये कमी गाणी गायली आणि शास्त्रीय संगीतावर भर दिला. जब वी मेट व्यतिरिक्त, त्यांनी माय नेम इज खान, मौसम, शादी में जरूर आना आणि हेट स्टोरी 2 सारख्या चित्रपटांमध्येही आपल्या आवाजाची जादू पसरवली. त्यांच्या निधनाने कला विश्वात शोककळा पसरली आहे.