मैसूर | 7 सितंबर 2023 : मैसूरच्या जगप्रसिध्द दसरा मिरवणूकीसाठी अजून वेळ असला तरी या मिरवणूकीसाठीची तयारी सुरू झाली. येथील मिरवणूकीत हत्तींची मिरवणूक पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. यंदाच्या हत्तींच्या मिरवणूकीसाठी हत्तींना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. मैसूरच्या दसरा सोहळ्यासाठी हत्तींची निवड केली असून वन विभागाने या हत्तींचा आणि त्यांच्या माहूतांसह जनतेचाही कोट्यवधी रुपयांचा अपघात विमा काढला आहे.
मैसूरचा विजयादशमी म्हणजेच दसरा सण अत्यंत पारंपारिक पद्धतीने दहा दिवस साजरा केला जातो. यात सोहळ्यात चामुंदेश्वरी देवीची मूर्ती सुशोभित सजवलेल्या हत्तींच्या अंबारीतून काढली जाते. मैसूरच्या संस्थानाची ही मिरवणूक दसऱ्याचे विशेष आकर्षण असते. या मिरवणूकीत हत्तींना सजविले जाते आणि त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. या मिरवणूकीसाठीचे हत्ती मैसूरला पोहचले असून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले आहेत.
या मिरवणूकीचे नेतृत्व 57 वर्षीय कॅप्टन अभिमन्यू हा हत्ती करणार आहे. त्याची उंची 274 मीटर असून वजन 47,00 ते 5000 किलो इतके आहे. यावेळी कॅप्टन अभिमन्यू सह एकूण 14 हत्ती मिरवणूकीस सहभाग घेणार आहेत. त्यात 10 नर हत्ती आणि 4 मादी हत्तीणींचा समावेश आहे, या सर्व हत्तींचा वन विभागाने विमा काढला आहे. नर हत्तींचा 5 लाख रुपयांचा तर मादी हत्तीणींचा 4.5 लाखांचा विमा काढण्यात आला आहे. तर हत्तींच्या माहूतांसह 42 कर्मचाऱ्यांचाही आणि नागरिकांचाही अपघात विमा काढण्यात आला आहे. एकूण 2.02 कोटींचा विमा उतरविण्यात आला आहे. अभिमन्यूच्या नेतृत्वाखाली कंजन, महेंद्र, विजया, वरलक्ष्मी, धनंजय, गोपी, भीम आदी हत्तींचे प्रशिक्षण सुरु झाले आहे.