संदीप राजगोळकर, टीव्ही9 मराठी, नवी दिल्ली | महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांनी बंड करत काका शरद पवार यांची साथ सोडली. राष्ट्रवादीतील मोठा गट हा दादांसोबत बाहेर पडला. अजित पवार सत्ताधारी भाजपसोबत सामिल झाले. थोरल्या पवारांच्या निष्ठावंतांनी अजित पवार यांच्यासोबत राज्य सरकारमध्ये मंत्रिमंडळाची शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची तर उर्वरित 8 राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या शिवसेना शिंदे गटातील आमदारांच्या पदरी निराशा पडली.
राज्यातील या राजकीय घडामोडींदरम्यान देशाच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारनंतर केंद्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार येत्या 72 तासात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या सोमवारी किंवा मंगळवारी हा मंत्रिमंडळ विस्तार पार पडण्याची शक्यता आहे.
विशेष बाब म्हणजे आठवड्यापूर्वी भाजपसोबत सत्तेत सामील झालेल्या अजित पवार गटालाही केंद्रात 1 मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता पवार गटामुळे शिंदेच्या शिवसेनेला राज्यानंतर केंद्रात भाकरीतील वाटणीला सामोरं जावं लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राला केंद्रात आणखी 2 मंत्रिपदं मिळणार आहेत. त्यापैकी 1 मंत्रिपद हे शिंदे गटाला आणि दुसरं मंत्रिपद हे सत्तेतील नव्या वाटेकरी असलेल्या पवार गटाला मिळणार आहे. इतकंच नाही, तर 2 मंत्रिपद जाणार असल्याची माहितीही आहे.
मोदी सरकारच्या या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांचं नाव आघाडीवर आहे. तर दुसऱ्या बाजूला शिंदेच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे यांना मंत्रिपद मिळू शकतं. मात्र या दोघांच्या नावाची अजून चर्चाच आहे. त्यामुळे पवार-शिंदे गटाकडून कोणता खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.
नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील 7 जणांचा समावेश आहे. या 7 पैकी 2 दिग्गज कॅबिनेट मंत्री आहेत. यामध्ये नितीन गडकरी आणि नारायण राणे यांचा समावेश आहे. तर आणि इतर पाच जणांकडे राज्यमंत्रिपद आहे. यामध्ये रामदास आठवले, रावसाहेब दानवे, भागवतराव कराड, भारती पवार आणि कपिल पाटील यांचा समावेश आहे.
नितीन गडकरी – केंद्रीय वाहतूक मंत्री, (कॅबिनेट).
नारायण राणे – सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, (कॅबिनेट).
कपिल पाटील – केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री
भागवतराव कराड – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री
भारती पवार – केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री
रावसाहेब दानवे – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री
रामदास आठवले – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री