दिल्ली : नव्या वर्षात पदार्पण करताना थंडीचा (cold) कहरही वाढला आहे. उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये हुडहुडी वाढली असून काही ठिकाणी तापमान शून्याच्याही खाली गेले आहे. राजधानी दिल्लीमध्ये आज (शुक्रवार 1 जानेवारी 2021) सर्वात निचांकी तापमान नोंदवले गेले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार (Weather Forecast) आजचे (शुक्रवार 1 जानेवारी 2021) तापमान 3.3 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. थंडीचा हा कहर आगामी दोन दिवसांपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार उत्तर भारतातील पर्वतीय प्रदेशांमधून येणाऱ्या थंड हवेमुळे वातावरणातील गारवा वाढला आहे. त्यामुळे थंडी वाढली आहे. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार मैदानी प्रदेशात आगामी दोन दिवस कडाक्याची थंडी पडणार आहे.
स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये निर्माण झालेल्या वादळामुळे उत्तर भारातातील काही प्रदेशांमध्ये पाऊस पडू शकतो. पंजाब, हरियाणा, चंडीगढ़, दिल्ली, उत्तर राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर-पश्चिम मध्य प्रदेश या भागामध्ये 2 जानेवारी ते 5 जानेवारीदरम्यान पावसाच्या हलक्या सरी बरसू शकतात. तर, 4 ते 5 जानेवरी या दोन दिवसांमध्ये उत्तर भारतातील काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो.
हरियाणामध्ये उणे तापमान
हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हरियाणातील काही भागांत थंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हरियाणातील हिसार येथे पारा शून्याच्याही खाली घसरला. हिसार येथे तापमान उणे 1.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तसेच नारसौल या भागामध्ये तापमान उणे 0.6 अंशापर्यंत आले होते. पंजाब राज्यामध्येसुद्धा वातावरणातील गारवा वाढला असून या राज्यातील काही ठिकाणी तापमान शून्यापर्यंत खाली आले. भटिंडा येथे गुरुवारी तापमान 0.0 अशं सेल्सिअसपर्यंत घसरले होते.
दरम्यान, घसरते तापमान आणि आगामी दोन दिवसांत थंडी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
संबंधित बातम्या :
नव्या कोरोनाचे देशात आणखी पाच रुग्ण, आतापर्यंत 25 बाधितांची नोंद
IRCTC ची वेबसाईट सुपरफास्ट, 1 मिनिटात 25 हजार तिकीट बुकिंग क्षमता, 12 नवे फीचर्स
योगींच्या राज्यात पाकिस्तानी महिला बनली सरपंच, उत्तर प्रदेशातील अजब कारभार