नवी दिल्ली | 19 डिसेंबर 2023 : लोकसभा आणि राज्यसभेच्या 141 खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टीव्ही 9 मराठीवर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी आक्रमक होत या निलंबनाचा निषेध केला आहे. शिवाय मोदीवर सरकारवर हल्लाबोल केला आहे. हा तर सत्तेचा गैरवापर असल्याचं शरद पवार म्हणालेत. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह 49 खासदारांना आज निलंबित करण्यात आलं. तर या हिवाळी अधिवेशनात आतापर्यंत 141 खासदारांना निलंबिक करण्यात आलं आहे. या निलंबनानंतर शरद पवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.
संसदेत जे काही घडलं. ते योग्य नव्हतं. सत्ताधारी पक्षाच्याच सदस्याच्या पासवर दोन तरूण लोकसभेत आले. तरूणांनी प्रेक्षक गॅलरीतून खाली उड्या मारल्या. गॅस फोडला. संसद परिसरातही असाच प्रकार घडला. ही अतिशय गंभीर बाब आहे. ज्या ठिकाणी हा प्रकार घडला तिथं 500 पेक्षा जास्त खासदार बसतात. त्यामुळे या खासदारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे या घडल्या प्रकाराची माहिती आम्हाला द्या, अशी मागणी विरोधी पक्षातील खासदारांनी केली. ती देखील दिली गेली नाही, असं शरद पवार म्हणाले.
संसदेत येणारे हे लोक कोण होते. त्यांचा हेतू काय होता? याची माहिती द्या, अशी मागणी विरोधी पक्षातील खासदारांनी केली. त्यांना माहिती न देता उलट त्यांच्यावरच कारवाई केली गेली. याचा अर्थ संसदीय लोकशाहीची प्रतिष्ठेचं सरकारला गांभीर्य नाही. उलट या खासदारांवरच कारवाई केली गेली. मग सुप्रिया सुळे असो. अमोक कोल्हे असो की अन्य खासदारांना निलंबित केलं, असं शरद पवार म्हणाले.
सुप्रिया सुळे यांना सात वेळेला संसदरत्न पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. नियम मोडायचा नाही, हे आमच्या पक्षाचं धोरण आहे. आमचे नेते नियम मोडत नाहीत. असं असताना केवळ काय घडलं याची माहिती द्या, अशी मागणी केली असता कारवाई करणं हा सरळ सरळ सत्तेचा गैरवापर आहे, असं शरद पवार म्हणालेत.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांनाही निलंबित करण्यात आलं आहे. या खासदारांसह काँग्रेसचे खासदार शशी थरूर, माला रॉय, मनीष तिवारी, चंद्रेश्वर प्रसाद, डिंपल यादव, कार्ति चिदंबरम, एसटी हसन यांनाही निलंबित करण्यात आलंय. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये आतापर्यंत 141 खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. यावर शरद पवारांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.