पंतप्रधानपदासाठी खर्गेंच्या नावाची चर्चा का? राहुल गांधींची भूमिका काय?; संजय राऊतांनी अंदर की बात सांगितली…

| Updated on: Dec 20, 2023 | 12:08 PM

Sanjay Raut on India Alliance meeting Loksabha Election 2024 : लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशातच जागावाटप कधी होणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. संजय राऊतांनी जागा वाटपाची तारीख सांगितली आहे, वाचा सविस्तर...

पंतप्रधानपदासाठी खर्गेंच्या नावाची चर्चा का? राहुल गांधींची भूमिका काय?; संजय राऊतांनी अंदर की बात सांगितली...
Follow us on

संदीप राजगोळकर, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली | 20 डिसेंबर 2023 : इंडिया आघाडीची राजधानी दिल्लीत काल बैठक पार पडली. इंडिया आघाडीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? यावर कालच्या या बैठकीत चर्चा झाली. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती आहे. खर्गे यांच्या नावाला अनेकांचा पाठिंबा असल्याची माहिती आहे. यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं. राहुल गांधी यांना कोणत्याही सत्तेच्या पदावर येण्याची इच्छा नाही. राहुल गांधी इंडिया आघाडीचा प्रमुख चेहरा जरूर आहेत. पण सध्या ते पक्ष बांधणीवर लक्ष देत आहेत, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

मविआचं जागावाटप कधी?

इंडिया आघाडीच्या या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत संक्षिप्त चर्चा झाल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. त्यांनी जागा वाटप कधी होणार यावरही सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीचं लोकसभेचं जागावाटप दिल्लीतच होणार असल्याचं संजय राऊत म्हणालेत. महाराष्ट्रात जागावाटपाबाबत चर्चा होणार नाही. तर दिल्लीतच ही चर्चा होईल. एक दिवशी तिन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक होईल. यात निर्णय होईल. 31 डिसेंबरच्या आत लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरेल.काँग्रेसचे वरिष्ठ नेते, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये याच महिन्यात चर्चा होईल. यात जागावाटप होईल, असं संजय राऊत म्हणालेत.

जागावाटपाचा फॉर्मुला ठरला?

महाराष्ट्रातील जागा वाटपाचा फॉर्मुला ठरला आहे. या बैठकीत काँग्रेस यांनी कमिटी ठरवली आहे. आमच्या तिन्ही पक्षात समनव्य व्हावा, यासाठी ही कमिटी असेल. महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत दिल्लीत चर्चा होईल. त्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची मान्यता आहे. 31 डिसेंबरच्या आधी आमचा जागा वाटपाचं ठरेल. उद्धव ठाकरे दिल्लीत येऊन राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार यांच्यासोबत चर्चा करतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

खासदारांच्या निलंबनावर राऊत म्हणाले…

141 खासदारांचं निलंबन हे सरकारच्या बेशरमपणाचं लक्षण आहे. निदान प्रधानमंत्र्यांनी खोटं बोलू नये. नरेंद्र मोदी आणि अंधभक्तांनी लोकशाहीच्या मंदिराचे स्मशान केलं आहे. तुम्ही जरी आग लावली तरी देशाची जनता सती जाणार नाही. मोदी काल म्हणाले विरोधी पक्ष वैफल्यग्रस्त झालेत. त्यांचं हे म्हणणं साफ चूक आहे. संसदेच्या सुरक्षेबाबत प्रश्न विचारणं चूक कसं असू शकतं, असं संजय राऊत म्हणालेत.