नवी दिल्ली: मुंबईच्या खार पोलीस ठाण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आणि शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर आता खासदार नवनीत राणा (navneet rana) यांनी थेट दिल्ली पोलिसांकडे राऊतांची तक्रार केली आहे. राणा यांनी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रारीचं पत्रं दिलं आहे. राऊत यांनी आपल्याला 420 म्हणत बदनामी केल्याचा आरोप राणा यांनी केला आहे. मी चांभार आहे आणि संजय राऊत ओबीसी आहेत. त्याचा दाखला देत त्यांच्याकडून माझी बदनामी झाल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे. मी चांभार जातीची असल्यामुळे शिवसेना आणि शिवसैनिक मला त्रास देत आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. राऊत यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे राऊत यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.
नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांच्या विरोधात शिवसैनिकांनी खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर राणा दाम्पत्यांना अटक करण्यात आली होती. सुरुवातीला राणा दाम्पत्यांनी अटक करून घेण्यास नकार दिला. मात्र, पोलीस या दोघांनाही पोलीस ठाण्यात घेऊन आले. त्यानंतर या दोघांनी राऊत आणि मुख्यमंत्र्यांविरोधात खार पोलीस ठाण्यात क्रॉस केस केली. तसेच काही शिवसैनिकांविरोधातही गुन्हा दाखल केला. या प्रकरणी काही शिवसैनिकांना अटक करण्यात आली. तर मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटकेनंतर टेबल जामीन देण्यात आला.
त्यानंतर राणा दाम्पत्यांना वांद्रे कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी कोर्टाने या दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या दोघांच्या जामिनावर येत्या 29 तारखेला सुनावणी करणार असल्याचंही कोर्टाने सांगितलं. तसेच येत्या 27 तारखेपर्यंत सरकारी वकील आणि पोलिसांना त्यांचं लेखी म्हणणं मांडण्यास सांगितलं. सत्र न्यायालयानेही राणा दाम्पत्यांना जामीन न दिल्याने त्यांना दिलासा मिळू शकला नाही.
त्यानंतर राऊत यांनी नवनीत राणा यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यांच्या जात प्रमाणपत्राचा उल्लेख करत त्या खोटारड्या असल्याचं म्हटलं होतं. राणा दाम्पत्य 420 असल्याचं राऊत यांनी म्हटल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी राऊतांविरोधात दिल्ली पोलीसांकडे तक्रार अर्ज केला आहे. त्यामुळे दिल्ली पोलीस काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.