‘मेक इन इंडिया’ला विलंब; नौदलावर लाईटवेट हेलिकॉप्टर्स लीजवर घेण्याची वेळ

| Updated on: Dec 08, 2020 | 10:45 AM

काही दिवसांपूर्वीच भारताने अमेरिकेकडून दोन समुद्ररक्षक ड्रोन लीजवर घेतले होते. | light utility helicopter

मेक इन इंडियाला विलंब; नौदलावर लाईटवेट हेलिकॉप्टर्स लीजवर घेण्याची वेळ
Follow us on

नवी दिल्ली: भारतीय नौदलाकडून आगामी काळात लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर्स (utility helicopters) लीजवर घेतली जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी ‘मेक इन इंडिया’ मोहीमेतंर्गत ही लाईटवेट हेलिकॉप्टर्स भारतातच तयार केली जाणार होती. मात्र, या प्रकल्पाला विलंब होण्याची चिन्हे असल्याने आता नौदलाने हेलिकॉप्टर्स लीजवर घेण्याचा विचार सुरु केला आहे. (Navy may take light utility helicopters on lease)

काही दिवसांपूर्वीच भारताने अमेरिकेकडून दोन समुद्ररक्षक ड्रोन लीजवर घेतले होते. ‘इकॉनॉमिक टाईम्स’च्या माहितीनुसार, सध्या नौदलाचे काही परदेशी कंपन्यांशी बोलणे सुरु आहे. जहाजांवर सामानाची आणि सैनिकांची ने-आण करण्यासाठी नौदलाला ही हेलिकॉप्टर्स हवी असल्याचे समजते.

नौदलाकडून 12 ते 18 चॉपर्स लीजवर घेण्याचा विचार

भारतीय नौदलाला तातडीने 12 ते 18 हेलिकॉप्टर्सची गरज असून ती लीजवर घेतली जाऊ शकतात. चार वर्षांसाठी ही हेलिकॉप्टर्स लीजवर घेतली जाऊ शकतात. दरम्यानच्या काळात चॉपर्सच्या देखभालीची व्यवस्था कंपनीकडे असेल. लीजवर असल्यामुळे या हेलिकॉप्टर्समध्ये फारशी शस्त्रास्त्रे असणार नाहीत. केवळ सुरक्षेसाठी या हेलिकॉप्टर्समध्ये मशीनगन असेल, असे सांगितले जात आहे.

भारतीय नौदलाकडे लाईटवेट हेलिकॉप्टर्सची कमतरता

सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय नौदलाकडे सध्या लाईटवेट हेलिकॉप्टर्सची कमतरता आहे. सध्या नौदलाकडून युद्धनौकांवर सामान आणि सैनिकांची ने-आण करण्यासाठी चेतक हेलिकॉप्टर्सचा वापर केला जातो. मात्र, चेतक हेलिकॉप्टर्स लहान जहाजांवर उतरवणे शक्य नाही. त्यामुळे नौदलाला लाईटवेट हेलिकॉप्टर्सची गरज आहे.

‘मेक इन इंडिया’ मोहीमेतंर्गत लाईटवेट हेलिकॉप्टर्सच्या निर्मितीसाठी वायूदलाने 21 हजार कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र, हिंदुस्थान एरोनॉटिक लिमिटेडमध्ये (HAL) उद्भवलेल्या काही समस्यांमुळे ‘मेक इन इंडिया’तंर्गत होऊ घातलेल्या हेलिकॉप्टर निर्मितीला खीळ बसली आहे.

भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढणार; ‘MH-60 रोमियो हेलिकॉप्टर’ लवकरच ताफ्यात दाखल होणार

भारतीय नौदलासाठी (Indian Navy) MH-60 रोमियो (MH-60R) हे हेलिकॉप्टर तयार केलं जात आहे. नुकताच या हेलिकॉप्टरचा लुक समोर आला आहे. अमेरिकन कंपनी लॉकहिड मार्टिनने (Lockheed Martin) शुक्रवारी भारतीय नौदल दिनानिमित्त (Indian Navy Day 2020) ‘MH-60 रोमियो या हेलिकॉप्टर’चा फोटो शेअर केला होता.

संबंधित बातम्या:

भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढणार; ‘MH-60 रोमियो हेलिकॉप्टर’ लवकरच ताफ्यात दाखल होणार

भारतीय नौदलाचा बंगालच्या उपसागरात अचूक मारा, चीन, पाकिस्तानला थेट इशारा

युद्धभूमीवरील भारतीय नौदलाच्या शक्तीचा ‘ट्रेलर’, लक्ष्याचा अचूक वेध घेणारा व्हिडीओ व्हायरल

(Navy may take light utility helicopters on lease)