निपाणी : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका जाहिर होताच आता आपापल्या पक्षाचा प्रचार शिगेला पोहचला आहे. यंदाच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ उमेदवार दिले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीने कर्नाटकातही जोरदार प्रचार सुरु केला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने आपले उमेदवार देताच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी कर्नाटकातील भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने कर्नाटकातील विधानसभेसाठी नऊ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यापैकी चार उमेदवार हे विजयी होणारच असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
निपाणीत 2 हजार 200 कोटींची काम केली असं सांगितलं जातं आहे, पण कुठेही विकास दिसत नाही.भाजपने लाखो-कोटीची पाण्याची कामं देशात केली आहेत, मात्र निपाणीला पाणी देण्याची दानत दाखवण्यात आली नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
यावेळी जयंत पाटील यांनी कर्नाटकातील भाजपवर टीका करताना म्हणाले की, अंड्यामध्येसुद्धा घोटाळा होऊ शकतो हे या मतदारसंघात आल्यावर कळलं. त्यामुळे या घोटाळ्याचं ऐकल्यावर मी डोक्यालाच हात लावला असल्याचेही त्यांनी सांगितले.
कर्नाटकात सर्वात भ्रष्ट सरकार या पाच वर्षात झाले असल्याचा घणाघातही त्यानी भाजपला लगावला आहे.या भ्रष्टाचारामुळेच या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा पराभव 100 टक्के होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पराभव टाळण्यासाठी मतांची विभागणी भाजप करत असल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी केला. काँग्रेसच्या काका पाटलांना ताकद देण्याचे काम भाजपच करत आहे.
तर पृथ्वीराज चव्हाण यांना काका पाटलांनी सांगितलं तुम्ही बोला राष्ट्रवादी भाजप सोबत जाणार आहे. तर उमेदवार सांगतो म्हटल्यावर पृथ्वीराज चव्हाण यांना ते खरं वाटलं असेल मात्र येणाऱ्या निवडणुकीत धर्मनिरपेक्ष पक्षाचे सरकार कर्नाटकात यावं ही आमची इच्छा आहे.
त्यामुळे आमचे उमेदवार येथे निवडून येणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. बेंगळूरुमध्ये सरकार स्थापन होत असताना शरद पवार यांचादेखील मोठा वाटा असणार आहे असंही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.
सरकारच्या काळात स्मृती इराणी गॅस दरवाढ झाल्यावर गॅस सिलेंडर मांडीवर आणि डोक्यावर घेऊन बसायच्या, त्याआधी त्या सिनेमात करायचा त्यामुळे त्या कुठेही घेऊन बसतील असा टोला त्यांनी स्मृती इराणी यांना लगावला आहे.
मोदींनी सिलेंडर वाटले पण आता गॅस दरवाढीमुळे तेच सिलेंडर चुलीवर जेवण करताना खाली बसण्यासाठी घेण्याची वेळ महिलांवर आली आहे असा घणाघातही त्यांनी भाजपवर केला आहे.