नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. सकाळी 11.30 वाजता ही भेट होणार आहे. यावेळी राहुल गांधी यांच्यासमवेत काँग्रेस खासदारांचं एक शिष्टमंडळही असणार आहे. महत्वाची बाब म्हणजे राहुल गांधी राष्ट्रपतीना भेटण्यासाठी जाताना संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत मार्च काढणार आहे. यावेळी कृषी कायद्याविरोधात 2 कोटी शेतकऱ्यांच्या सह्या असलेलं एक पत्र राहुल गांधी राष्ट्रपती कोविंद यांना देणार आहेत. (Rahul Gandhi will meet President )
राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 29वा दिवस आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात हे आंदोलन सुरु आहे. यादरम्यान सरकार आणि कृषी संघटनांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. पण अद्याप या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही. केंद्र सरकार कृषी कायद्यात सुधारना करण्यास तयार आहे. मात्र शेतकरी संपूर्ण कायदाच रद्द करा, या मागणीवर ठाम आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला काँग्रेसनं यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचाच भाग म्हणून राहुल गांधी आज दुसऱ्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेत आहेत.
9 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाच्या 5 नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. त्यात राहुल गांधी यांच्याही समावेश होता. त्यावेळी देशाच्या विकासात शेतकऱ्यांचं योगदान प्रचंड आहे. ते दिवस रात्र घाम गाळून देशाला विकासाच्या मार्गावर नेत आहेत, असं सांगतानाच केंद्र सरकारने आणलेले कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत. त्यामुळे ते रद्द करण्यात आले पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या विरोधी पक्षाने तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे. या शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी, सीपीएम नेते सीताराम येचुरी, सीपीआय महासचिव डी राजा आणि डीएमके नेते टी. के. एस. इलेनगोवन उपस्थित होते.
शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. अत्यंत शांततेत त्यांचं आंदोलन सुरू आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. कृषी विधेयकावर चर्चा करण्यासाठी ते सिलेक्ट कमिटीकडे पाठवायला हवे होते. पण दुर्देवाने ही विधेयकं घाईत मंजूर करण्यात आली, असं पवारांनी सांगितलं.
सोनिया गांधी या सध्या काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षपदावर आहेत. त्यामुळे काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष द्या, अशी मागणी काँग्रेसमधीलच ज्येष्ठ नेत्यांकडून वारंवार केली जात आहे. कपिल सिब्बल, आनंद शर्मा, गुलान नबी आझाद यांनी तर बिहार निवडणुकीनंतर काँग्रेसच्या कार्यप्रणालीवरच बोट ठेवलं होतं. त्यामुळे काँग्रेसमध्ये अतंर्गत कलह निर्माण झाल्याची परिस्थिती बनली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. काँग्रेसच्या निवडणूक समितीने निवडणूक प्रक्रियेची सर्व माहिती सोनिया गांधी यांच्याकडे सुपूर्द केली आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीचीही शिफारस यावेळी करण्यात आल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधींना पसंती देण्यात आल्याचं कळतंय. आता निवडणूक प्रक्रियेनंतर त्याची औपचारिक घोषणा होऊ शकते.
संबंधित बातम्या:
शेतकऱ्यांचं म्हणणं ऐका, कृषी कायदा रद्द करा; विरोधकांची राष्ट्रपतींकडे मागणी
MSP कायम ठेवणार, सरकारचं आश्वासन; कायदेच रद्द करा, शेतकरी मागणीवर ठाम
Rahul Gandhi will meet President