संदिप राजगोळकर, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली | 13 डिसेंबर 2023 : लोकसभेचं कामकाज सुरु असताना अचानक गोंधळ झाला. या प्रकरणी दोघांना अटक झाली आहे. एका महिलेला आणि महाराष्ट्रातील एका तरूणाला अटक झाली आहे. अमोल शिंदे असं या तरूणाचं नाव आहे. अमोल लातूरमधील झरे गावचा आहे. तर हरियाणातील महिलेलाही पोलिसांनी अटक केली आहे. नीलम कौर सिंह असं या अटकेत असलेल्या महिलेचं नाव आहे. हरियाणातील हिसार शहरातील ही महिला आहे. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
संसदेत गोंधळ घालणारा तरूण अमोल शिंदे हा लातूर जिल्ह्यातील आहे. अमोल लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्याच्या झरी गावचा रहिवासी आहे. त्याचे आई-वडील शेतमजूर आहेत. अमोल सध्या कॉलेजमध्ये शिकतो आहे.अमोल जेव्हापासून कॉलेजमध्ये जातोय. तेव्हापासून तो घरी आलेला नाही. अमोलविषयीची ही माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली आहे.
संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज सकाळी संसदेचं कामकाज सुरु झालं. आजच्याच दिवशी 2001 मध्ये संसदेवर हल्ला झाला होता. सकाळी कामकाज सुरु होताच या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली. पुढे काहीच वेळात संसदेत गोंधळ पाहायला मिळाला. संसदेबाहेर आधी फटाके फोडण्यात आले. त्यानंतर दोघेजण संसदेच्या आत गेले. लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीत जात या दोघांनी गोंधळ घातला.
संसदेचं कामकाज सुरु असताना दोन अज्ञात व्यक्तींनी लोकसभेत उडी घेतली. प्रेक्षक गॅलरीतून अज्ञातांनी लोकसभेत उडी मारली. यावेळी त्यांच्याकडे स्मोक कँडल होती. अज्ञातांनी स्मोक कँडल वापरल्याने मंत्री आणि खासदारांचा गोंधळ उडाला. त्यानंतर सगळे खासदार सभागृहाबाहेर पडले.
संसदेत गोंधळ झाल्यानंतर आता महत्वाची बैठक होणार आहे. संध्याकाळी चार वाजता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही महत्वाची बैठक बोलावली आहे. सर्वपक्षीय नेत्यांना बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. आज झालेली घटना आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा होणार आहे.