नवी दिल्ली : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. याच काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदारांवर शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला होता. यामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून दिल्ली उच्च न्यायालयामध्ये मानहानीचा दावा दाखल करण्यात आला होता. त्यावरून सुनावणीकरिता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय यांना दिल्ली उच्च न्यायालयाने समन्स बजावले आहेत. त्यावरून ठाकरे पितापुत्रासाहित संजय राऊत सुनावणीला हजर राहणार का? याबाबत चर्चा सुरू असतांना खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
खरंतर याचिकेत संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संदर्भात केलेल्या एका व्यक्तव्याचा आधार घेण्यात आला आहे. यामध्ये संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पैसे देऊन निकाल दिल्याचा आरोप केला होता. त्यावेळी धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव एकनाथ शिंदे यांना मिळालं होतं.
याशिवाय गद्दार, चोर, पन्नास खोके एकदम ओके अशा स्वरूपाची टीका करण्यात आली होती. त्या टीकेचाही याचिकेत राहुल शेवाळे यांनी उल्लेख करत मानहानीची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यानंतर आता सुनावणी होणार आहे.
या सुनावणीला ज्यांच्या वर आरोप करण्यात आले आहे त्यांना समन्स बजावण्यात आला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा खासदार राहुल शेवाळे यांनी केला होता. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोर्टाने जर समन्स बजावले असेल तर आम्ही नक्की हजर राहू. कुठल्याही कोर्टात जा आम्ही तयार आहे. आम्ही भाषणाला गेलो की लोकं बोलतात पन्नास खोके एकदम ओके मग आता काय 12 कोटी जनतेला समन्स पाठवणार आहात का? जम्मू काश्मीरमध्ये लोकांनी घोषणा दिल्या मग त्यांना समन्स बजावणार का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.
पन्नास खोके एकदम ओके याबद्दल जिथे जाऊ तिथे लोकं घोषणा देतात. याशिवाय त्यांनी उपस्थित केलेल्या निवडणूक आयोगाच्या बाबतच्या प्रश्नावर आम्ही कोर्टात त्याचे उत्तर देऊ म्हणत संजय राऊत यांनी राहुल शेवाळे यांच्यासह एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरम्यान फटे लेकिन हटे नहीं अशी आमची भूमिका असल्याचे संजय राऊत यांनी सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता हल्लाबोल केला आहे. त्यामुळे आता सुनावणी दरम्यान काय घडतं हे पाहणं महत्वाचे ठरेल.