नवी दिल्ली : नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची सर्व तयारी आता पूर्ण झाली आहे. तर दुसरीकडे, 28 मे रोजी संसदेजवळ महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांकडून परवानगी देण्यात आली नाही. नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेबाबत पोलिसांनी सांगितले की, संसद भवनाच्या आजूबाजूचे सर्व रस्ते सर्वसामान्यांच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. तर वाहतूक पोलिसांकडून लोकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस दल आणि पॅरा मिलिटरीही तैनात करण्यात येणार असून, यावेळी महिला पोलिसांच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीत निमलष्करी दलाच्या 20 हून अधिक तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 10 हून अधिक महिलांच्या तुकड्या बोलवण्यात आल्या आहेत.
तर संसदेजवळील मेट्रो स्टेशनही बंद राहणार आहेत. 28 मे रोजी नवीन संसदेच्या उद्घाटनावेळी दोन मेट्रो स्टेशन बंद करण्यासाठी दिल्ली मेट्रोला आधीच पत्र देण्यात आले होते.
90 खापांचे 3000 शेतकरी दिल्लीत दाखल होऊ शकतात अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, यूपी आणि हरियाणातील शेतकरी या काळात दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती मिळत आहे.
त्यामुळे जवळपास 3000 च्या आसपास 90 खाप दिल्लीत प्रवेश करू शकतात अशी शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे. या कार्यक्रमानिमित्त सिंघू बॉर्डर, दिलशाद गार्डन बॉर्डर, बदरपूर बॉर्डर आणि टिकरी बॉर्डर येथे बॅरिकेडिंग करण्यात येणार असून पोलीस तसेच निमलष्करी दलाचे जवानही त्या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत.
सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर उत्तर-पूर्व जिल्ह्यात अतिरिक्त 6 तुकड्या ठेवण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये 2 महिला पोलिसांच्या तुकड्यांचाही समावेश आहे. त्यामुळे जर कोणी यूपीमधून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना तिथेच रोखले जाणार आहे. तसेच राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांवरही बंदी घालण्यात येणार आहे.