मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्ष नेते अजित पवार हे 40 आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा रंगू लागलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर विद्यमान सरकार मध्ये मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी यावर भाष्य केले आहे. अजित पवार हे शरद पवार यांना विचारूनच निर्णय घेतील. मात्र, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण ते जर सरकारमध्ये येत असतील तर विरोधी पक्षात बसून टीका टिप्पणी करण्यापेक्षा ते आमच्या सोबत येतील यापेक्षा गोड बातमी कुठलीच असू शकत नाही असंही अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. याशिवाय अजित पवार हे सरकारमध्ये आले तर त्यांचं स्वागतच आहे असंही अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.
शेवटी सुप्रीम कोर्ट सुप्रीम आहे आणि सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय येईल तो सर्वांसाठी अंतिम राहील. परंतु, ह्या ज्या राजकीय घडामोडी काय आजच घडत नाहीये अनेक दिवसापासून घडत आहे. ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होती त्याच्या पाठीमागे आगळी वेगळी भूमिका असते.
अजित दादांचा आणि शरदचंद्रजी पवार साहेबांमध्ये पहिले दोघांमध्ये काय सुसंवाद आहे का वाद आहे? हा प्रश्न जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत मी बोलणं यामध्ये उचित होणार नाही. राजकारणामध्ये परिस्थिती उद्भवत असते आणि अशा परिस्थितीमध्ये कसं राजकारण होतं हे तुम्ही पहिले असेल.
आसमान में जैसा बारिश आती है, बारिश का कोई भरोसा नही, आदमी की सासो का कोई भरोसा नही, वैसा अभी राजकारण का कोई भरोसा नही अशी स्थिती झाली आहे. हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार आणि मुख्यमंत्री ज्या गतीने या राज्यामध्ये काम करत आहे ते पाहता आम्हाला कुठलीही भीती नाही असे अब्दुल सत्तार यांनी म्हंटलं आहे.
अजित पवार हे काही आमदारांसोबत राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपसोबत सत्ता स्थापन करेल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यातच आता अजित पवार यांच्यासोबत 53 पैकी 40 आमदार असल्याचं एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तांत म्हटले आहे.
अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे 53 पैकी 40 आमदार आहेत. असं वृत्त द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. योग्यवेळ आल्यावर 40 आमदारांच्या पाठिंब्याची यादी अजित पवार राज्यपालांना देणार असल्याचेही त्यामध्ये म्हंटले आहे.
यामध्ये अजित पवार यांनी 40 आमदारांना वैयक्तिकरित्या संपर्क साधल्याचे समोर आले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधी अजितदादांनी शपथ घेतल्यास सरकर पडण्याची वेळ येणार नाही असंही त्या वृत्तात म्हंटलं गेलं आहे.