नवी दिल्ली: राज्यातील महत्वाच्या जलसिंचन प्रकल्पांवर दिल्लीमध्ये महत्वाची बैठक पार पडली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्र शेखावत, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या बैठकीला हजर होते. महाराष्ट्रातील मोठे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर या बैठकीत चर्चा झाली. विशेषतः महाराष्ट्रातील गोसीखुर्द प्रकल्प 2023 पर्यंत पूर्ण करण्यावर या बैठकीत जोर देण्यात आलाय. नितीन गडकरींनी यावेळी बोलताना नागपूरच्या नाग आणि मुळा मुठा प्रकल्पांचं काय होणार हे सांगितले. यावेळी गडकरी यांनी महाराष्ट्र सरकारला प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्याही सूचना दिल्या. प्रकल्प वेळेत पूर्ण केले नाहीतर यापुढे राज्यालाचं खर्च करावा लागेल, असंही गडकरींनी सांगितले. (Nitin Gadkari gave information about Nag and Mula Mutha Project)
नागपूरची पुरातन नाग नदीचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. हा प्रकल्प एकूण 1700 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मंजुरीही मिळाली होती. मात्र, कोरोनामुळे हे काम थांबलं होतं. कोरोनामुळे आर्थिक संकट उभं राहिल्याने सरकारने कोणताही नवा प्रकल्प हाती न घेण्याचं ठरवलं होतं. मात्र, केंद्रीय अर्थमंत्र्यांशी बोलून हा प्रकल्प सुरू करण्याची परवानगी मिळवली आहे. त्यामुळे आता सल्लागार वगैरे नेमून टेंडर प्रक्रिया सुरू करू, त्यामुळे लवकरच हा प्रकल्प मार्गी लागेल, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.
मुळा-मुठा प्रकल्प पूर्ण होणार
या बैठकीत पुण्यातील मुळा-मुठा नदीचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 1200 कोटींचा हा प्रकल्प आहे, तो लवकरात लवकर पूर्ण करण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला.
पंतप्रधान सिंचन योजनेत 28 प्रकल्प
नितीन गडकरी म्हणाले, “पंतप्रधान सिंचन योजनेत एकूण 28 प्रकल्प आहेत आणि बळीराजात 96 प्रकल्प आहेत. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 75 टक्के नाबार्डचं कर्ज आहे. या कर्जाच्या 2 टक्के व्याजाची पूर्तता केंद्र सरकार करेल तसेच 25 टक्के अनुदानही देणार आहे. त्यामुळे हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अधिकचा फार पैसा लागत नाही. या निधीतच हे प्रकल्प पूर्ण होतात. महाराष्ट्रात 50 टक्क्यांपेक्षा अधिक काम झालंय आणि 12-15 वर्षांपासून पैशांअभावी काम थांबलंय त्याबाबत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आमच्या विभागाला प्रस्ताव दिला होता. त्याप्रमाणे 28 प्रकल्प पंतप्रधान सिंचन योजनेत आणि 108 प्रकल्प बळीराजा योजनेत आले. त्यातील 8-10 प्रकल्पांमध्ये तांत्रिक अडचणी आल्या. सध्या 96-98 प्रकल्प या योजनेत आहेत.”
गोसीखुर्दचा प्रकल्प दोन वर्षात पूर्ण होणार? हा आहे गडकरी मार्गhttps://t.co/i3TV9K1Dd6#GosekhurdProject | #NitinGadkari | #JayantPatil | #DevendraFadnavis @Jayant_R_Patil @nitin_gadkari @Dev_Fadnavis
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 27, 2021
संबंधित बातम्या:
जेव्हा महाराष्ट्राच्या प्रकल्पांसाठी गडकरी, जयंत पाटील आणि फडणवीस एक होतात!
गोसीखुर्दचा प्रकल्प दोन वर्षात पूर्ण होणार? हा आहे गडकरी मार्ग
(Nitin Gadkari gave information about Nag and Mula Mutha Project)