देशात लोकसभेचा निकाल आल्यापासून इंडिया आघाडीला पण सत्ता स्थापनेचे स्वप्न पडत आहे. त्यासाठी दम लगा के हईशा सुरु आहे. हाकारे पिटल्या जात आहेत. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना खलिते पाठविण्यात आले आहे. दूतांमार्फत सांगावा धाडण्यात आला आहे. उद्या एनडीएचा शपथविधी सोहळा होण्यापूर्वी तरी काही चमत्कार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण इंडिया आघाडीच्या आशा टवटवीत आहेत. मोदींना रोखण्यासाठी इंडिया आघाडीने नितीश कुमार यांना पंतप्रधाना पदाची ऑफर दिली आहे. त्यावर जनता दलाकडून (संयुक्त) त्यांना असं सणसणीत उत्तर मिळालं आहे.
इंडिया आघाडीला नितीशबाबूंचा टेकू
इंडिया आघाडीला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी अनेक तडजोडी कराव्या लागतील. त्यांच्या आशा मजबूत आहे. उद्या एनडीएची शपथविधीची तयारी जोरदार आहे. इंडिया आघाडीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा टेकू हवा आहे. चंद्राबाबू नायडू आले तर मग चार चांद लागतील. पण या सर्व कवायतींना काही केल्या यश काही येईना, त्यातच जेडीयूने असा करार जवाब दिला आहे की मुद्यातील हवाच निघून गेली आहे.
जेडीयूने दिले सणसणीत उत्तर
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने जोरदार प्रदर्शन केले. दिग्गज विश्लेषकांना पाणी पाजले. एनडीए 400 पारच्या नाऱ्यातील हवाच काढली. इंडिया आघाडीने नाही नाही म्हणता मोठी मजल मारली. आता सत्ता स्थापण्यासाठी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी इंडिया आघाडी चाचपणी करत आहे. त्यांना गेल्यावर्षीचा त्यांच्या मित्राची नितीश कुमार यांची आठवण न येईल तर नवलच. त्यांनी या मित्राला गळ घालून पाहिला. इंडिया आघाडीचे संयोजक पद देण्यासाठी काँग्रेसने कुरकुर केली आणि आता नितीश कुमार यांना पंतप्रधान पद द्यायला निघालेत, असे सणसणीत उत्तर जेडीयुचे ज्येष्ठ नेते केसी त्यागी यांनी दिले.
आकड्यांचा खेळ असा
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला 240 आणि एनडीएला 293 जागा आहेत. त्यात नितीश कुमार यांच्या जनता दलाला (संयुक्त) 12 तर तेलगू देसम पक्षाला 16 जागा आहेत. नितीश कुमार यांना इंडिया आघाडीने पंतप्रधान पदाची ऑफर दिल्याचे समजते. पण केसी त्यागी यांनी ही ऑफर धुडकावली आहे. त्यांनी काँग्रेसला इंडिया आघाडीच्या स्थापनेवेळीची आठवण करुन दिली आहे. नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीची मोट बांधली होती. पण नंतर त्यांनाच बाजूला करण्यात आल्याने नितीश कुमार यांनी पुन्हा मोदींकडे धाव घेतली.