नोएडा: देशातील भ्रष्टाचाराचं उंच प्रतिक असणाऱ्या ट्विन टॉवरला (Twin Towers Demolition) आज जमीनदोस्त केलं जाणार आहे. 20 कोटींचा खर्च करून हा टॉवर पाडला जाणार आहे. अवघ्या 12 सेकंदात बेकायदा इमले पाडले जाणार आहेत. या टॉवरमध्ये 9 हजार 640 होल करून त्यात 3 हजार 700 किलो दारूगोळा भरला गेला आहे. थोड्याच वेळात ट्विन टॉवर जमीनदोस्त केला जाणार आहे. आज दुपारी अडीच वाजता हा टॉवर पाडला जाईल. या टॉवरच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या परिसरात न येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा टॉवर पाडल्यानंतर त्याचा मलबा हटवण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. तसंच त्याचे पर्यावरणीयदृष्या गंभीर परिणाम होणार आहेत. दिल्ली आणि एनसीआर आणि परिसरात आधीच हवेचा दर्जा चांगला नाहीये. त्यातच हे पाडकाम केल्यानंतर हवेच्या प्रदूषणात (Pollution) वाढ होणार आहे. देशात पहिल्यांदाच एवढा मोठा स्फोट करून इमारत पाडली जाणार आहे.
ट्विन टॉवर्सच्या आजूबाजूचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. या इमारतीच्या 500 मीटरच्या आत कोणत्याही व्यक्ती किंवा प्राण्याला परवानगी नाही. दोन्ही टॉवर रिकामे करण्यासाठी 3700 किलो स्फोटकांचा वापर करण्यात येणार आहे. हा टॉवर पाडल्यानंतर 55 हजार ते 80 हजार टन मलबा निघणार आहे. हा मलबा हटवण्यासाठी किमान 3 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. एवढे ट्रक्स त्यासाठी आणण्यात आले आहेत.
नोएडामध्ये आधीच प्रचंड हवा प्रदूषण आहे. त्यातच आता हा टॉवर पाडल्यानंतर त्यात भर पडणार आहे. स्फोट होताच हवेत काँक्रीटचे, धुळीचे कण परसतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होणार आहे. मात्र त्याआधीच नोएडा प्राधिकरणाकडून विशेष खबरदारी घेतली आहे. 100 पाण्याचे टँकर या भागात तैनात करण्यात आले आहेत. 15 अँटी स्मॉग गन, 6 मेकॅनिकल स्वीपिंग मशीन, सुमारे 200 सफाई कामगार आणि 20 ट्रॅक्टर ट्रॉली तैनात करण्यात आले आहेत. पाडकाम झाल्यानंतर लगोलग त्या परिसरात पाणी फवारलं जाणार आहे.
नोएडा प्राधिकरणाने लोकांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. धुळीचा प्रभाव टाळण्यासाठी काही तास या परिसरात मास्क घालणं अनिवार्य करण्याता आलं आहे. पार्श्वनाथ प्रतिष्ठा आणि पार्श्वनाथ सृष्टी सोसायटी, गेढा गाव, सेक्टर-92, 93, 93A, 93B या भागात लहान मुलं, वृद्ध आणि श्वसनाच्या रुग्णांना खबरदारी म्हणून मास्क घालण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.