नवी दिली | 8 मार्च 2024 : जगप्रसिध्द आयटी कंपनी इन्फोसिसचे सह संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी प्रसिद्ध लेखिका आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्ष सुधा मुर्ती यांचे राज्यसभेसाठी नामांकन केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान यांनी ही घोषणा केली आहे. आपल्या एक्स ( आधीचे ट्वीटर ) अकाऊंटवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहीती दिली आहे. साल 2006 मध्ये सुधा मूर्ती यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी सरकारने पद्मश्री पुरस्कार प्रदान केला होता.
येथे पहा ट्वीट –
I am delighted that the President of India has nominated @SmtSudhaMurty Ji to the Rajya Sabha. Sudha Ji’s contributions to diverse fields including social work, philanthropy and education have been immense and inspiring. Her presence in the Rajya Sabha is a powerful testament to… pic.twitter.com/lL2b0nVZ8F
— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2024
सुधा मुर्ती या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा असून त्या टाटा कंपनीत रुजू होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला इंजिनिअर आहेत. त्यांचा विवाह इंजिनिअर नारायण मूर्ती यांच्याशी झाला. त्यानंतर नारायण मूर्ती यांनी इन्फोसिस कंपनीची भारतात स्थापना केली आणि आज यशस्वी उलाढाल करणारी जगातील एक प्रख्यात आयटी कंपनी आहे. इन्फोसिसच्या निर्मितीत सुधा मूर्ती यांचाही मोठा सहभाग आहे. सुधा मूर्ती यांचे दागिने घेऊन त्यातून नारायण मूर्ती यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने इन्फोसिसची मुहूर्तमेढ रोवली होती. सुधा मूर्ती या शिक्षिक आणि लेखिका देखील आहेत. त्यांची अनेक पुस्तके बेस्ट सेलर आहेत. आपल्या साध्या आणि पारंपारिक मुल्ये जतन करणाऱ्या स्वभावामुळे त्या प्रसिद्ध आहेत. 2006 मध्ये मूर्ती यांना भारत सरकारने त्यांच्या सामाजिक कार्यासाठी पद्मश्री या भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते. सुधा मुर्ती यांची कन्या अक्षता हिच्याशी लंडनचे पंतप्रधान ऋषि सुनक यांचा विवाह झाल्याने ते सुधा मूर्ती यांचे जावई आहेत.
सामाजिक कार्य, सामाजिक बांधीलकी आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रात सुधाजींचे योगदान अतुलनीय आणि प्रेरणादायी आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. सुधा मूर्ती यांचा जन्म कर्नाटकातील देशस्थ माधव ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांची संस्कृती आणि परंपरेशी नाळ घट्टपणे जुळलेली आहे. कन्नड आणि इंग्रजी या दोन्ही भाषांवर त्यांचे चांगले प्रभुत्व आहे. समाजसेवा आणि साहित्यात त्यांनी आपल्या योगदानाने मोठे काम केले आहे. त्यांची ‘डॉलर बहू’ ही कादंबरी त्यांनी मुळात कन्नडमध्ये लिहिली गेली होती आणि त्यानंतर इंग्रजीमध्ये त्यांनी अनुवादित केली, त्यांची कन्या अक्षता हीचा लंडनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी विवाह झाला आहे.सुधा मूर्ती यांची दीडशेहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी लैंगिक भेदभाव आणि स्टिरियो टाइपच्या विरोधात लिहिले आहे. त्यांची एकूण संपत्ती 775 कोटी असल्याचे म्हटले जाते. तरीही त्या अत्यंत साधेपणाने जीवन जगतात. सुधा मूर्ती सांगतात की, गेल्या तीस वर्षांत त्यांनी एकही नवीन साडी घेतलेली नाही. त्यांना शाकाहार खूपच पसंत आहे. परदेशात जाताना त्या शाकाहारी जेवण सोबतच घेऊन जातात.