नवी दिल्ली | 03 ऑगस्ट 2023 : टोमॅटोच्या किंमती (Tomato Price) गगनालाच भिडलेल्या आहे. केंद्र सरकारने केलील उपाय योजना तात्पुरती मलमपट्टीच ठरली. संपूर्ण भारतात टोमॅटोच्या किंमतींना उच्चांक गाठला आहे. यंदा मान्सूनने टोमॅटो पिकाचे चक्र बिघडवले आहे. मे महिन्यात टोमॅटोचा दर 20 रुपये किलो होता. जून महिन्यापासून टोमॅटो किरकोळ बाजारात 200 रुपयांहून अधिक किंमतींना विक्री झाला. उत्तर भारताला दक्षिणेतून आणि नेपाळमधील टोमॅटोचा पुरवठा झाला. पश्चिम भारतासह दक्षिणेतील राज्यांना पावसाने झोडपल्याने त्याचा परिणाम किंमतींवर दिसून आला. ग्राहक मंत्रालयाने बुधवारी टोमॅटोच्या किरकोळ बाजारातील किंमती 203 ते 259 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचल्याचे स्पष्ट केले. पण दरवाढीचा हा उच्चांक इथंच थांबणार नाही. तर त्यापेक्षा ही पुढे (Tomato Price Hike) जाण्याची शक्यता आहे.
स्वस्त टोमॅटो विक्री
केंद्र सरकारने टोमॅटोच्या वाढत्या किंमतींना लगाम घालण्यासाठी सहकारी संस्थांना हाताशी धरले होते. त्यामाध्यमातून स्वस्त टोमॅटो विक्रीची कवायत सुरु केली होती. ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्सने (ONDC) 70 रुपये प्रति किलो दराने टोमॅटो विक्री केली. एका आठवड्यात 10,000 किलो टोमॅटोची विक्री झाली.
दक्षिणेतून पुरवठा
राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ आणि नाफेड यांनी आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून टोमॅटोची खरेदी केली. हे टोमॅटो दिल्लीसह बिहार, राजस्थान आणि उत्तरेत विक्री करण्यात आले. स्वस्तात टोमॅटो मिळत असल्याने त्याची विक्री वाढली आहे. अद्यापही अनेक ग्राहकांना या योजनेतून टोमॅटो खरेदी करता आलेले नाहीत.
पुन्हा दरवाढीचा भडका का?
गेल्या दोन दिवसांपासून किरकोळ बाजारात टोमॅटोचा पुरवठा घटला आहे. त्याचा परिणाम दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यात अनियमीत पावसाचा फटका टोमॅटोच्या पिकांना बसला आहे. कमी पुरवठ्यामुळे भावाने पुन्हा डोके वर काढले आहेत. किरकोळ बाजारात त्यामुळेच किंमती भडकल्या आहेत. आशियातील सर्वात मोठं किरकोळ भाजीपाला व फळ बाजार आझादपूर मंडी आहे. याठिकाणी टोमॅटो 170-220 रुपये प्रति किलो विक्री होत आहे.
तर टोमॅटो 300 रुपये किलो
टोमॅटोने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. काही भागात जोरदार पाऊस तर काही भाग अजूनही पावसाच्या प्रतिक्षेत आहे. त्याचा परिणाम पिकांवर दिसून येत आहे. घाऊक बाजारात टोमॅटोच्या किंमती 300 रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. तर किरकोळ बाजारात पण टोमॅटो गगनाला भिडण्याची शक्यता आहे. दरवाढीचा सर्वात मोठा फटका ग्राहकांना बसत आहे.
व्यापाऱ्यांना पण फटका
पावसाळी वातावरणामुळे अनेक ठिकाणी टोमॅटो कॅरेटमध्ये सडत आहेत. त्यामुळे नफ्याचे गणित जमविताना व्यापाऱ्यांना फटकाही बसत आहे. सडलेला, दबलेला टोमॅटो विक्री होत नाही. तो फेकून देण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनाही फटका बसत आहे.