नवी दिल्ली : अनेकदा व्यक्ती तृतीयपंथी (Transgender) आहे म्हणून तिच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोण बदलतो. तृतीयपंथी आहे म्हणून अनेकदा संबंधित व्यक्तींकडून रोजगाराच्या (job) संधी हिरावून घेतल्या जातात. एखादा व्यवसाय करण्यासाठी किंवा कामासाठी संबंधित व्यक्ती कितीही पात्र असली तरी देखील ते काम मिळवण्यासाठी त्याच्या वाट्याला मोठा संघर्ष येतो. एवढे करून देखील अनेकदा संधीपासून वंचित रहावे लागते. मात्र आता हळूहळू या परिस्थितीमध्ये बदल होत असून, तृतीयपंथी व्यक्तींनाही संधीचं अवकाश मोकळ होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आता त्यांच्यासाठी वैमानिक बनण्याचे दरवाजे उघडले आहेत. याबाबत नागरी विमान वाहतूक संचालनायन (DGCA) कडून नवी नियमावली आणि दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये पात्र ठरणाऱ्या तृतीयपंथी व्यक्तींना आता आकाशात भरारी घेण्याची संधी मिळणार आहे.
विमान वाहतूक संचालनालयाकडून याबाबतचे दिशानिर्देश जारी करण्यात आले असून, पात्रता पूर्ण करणाऱ्या तृतीयपंथी व्यक्तींना पायलट बनता येणार आहे. देशातील सुमारे पाच लाख तृतीयपंथी व्यक्तींपैकी इच्छुकांना विमान वाहतूक संचालनालयाने घातलेल्या अटींची पूर्तता केल्यानंतर वैमानिक बनता येणार आहे. त्याबाबतची कायदेशीर मान्यता त्यांना मिळणार आहे. अमेरिका, इंग्लंड सारख्या देशात काही वर्षांपूर्वीच तृतीयपंथी व्यक्तीचा वैमानिक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र भारतात काही कायदेशीर बाबींमुळे हा मुद्दा मागे पडला होता. मात्र आता डीजीसीएच्या परवानगीनंतर मान्यता मिळाली आहे.
जारी करण्यात आलेल्या दिशानिर्देशांनुसार वैमानिक पदाची परीक्षा पास होणाऱ्या तृतीयपंथी व्यक्तीला त्याची शारीकिक आणि मानसिक क्षमता तसेच कौशल्याच्या आधारावर वैमानिकाचा परवाना देण्यात येणार आहे. लिंगपरिवर्तनाचे उपचार घेऊन ज्यांना पाच वर्ष पूर्ण झाले आहेत, अशा व्यक्तिंना परवान्यासाठी अर्ज करता येणार आहे. सर्व अटींची पूर्तता केलेल्या व्यक्तींना परवाना देण्यात येणार आहे.